हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले गावाकडून जिल्हा परिषदेच्या शास्त्रीनगर भागातील त्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे सरकारी वाहनात येत असताना, समोरून येणार्‍या वाळूच्या टिप्परने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. एवढच नाहीतर अध्यक्षांना गाडी बाहेर ओढून बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. या मारहाणीत बेले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी भरदिवसा घडली असून अध्यक्षांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे खुद्द अध्यक्षांनी सांगितले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले हे त्यांच्या गावाकडून शासकीय वाहनाने शास्त्रीनगर भागात असलेल्या त्यांच्या निवासस्थानाकडे येत होते. दरम्यान, तहसील कार्यालयासमोरील पुलाजवळील वळणाकडून वाळूने भरलेले एक टिप्पर क्रमांक एम.एच.१२ एच.डी. ३१५६ हे त्यांच्याविरूद्ध दिशेने येत होते. जिल्हा परिषद अध्यक्षांनी वळणावर त्यांच्या निवासस्थानाकडे वळण्यासाठी हात दाखविला मात्र टिप्पर चालकाने बेले यांच्या शासकीय वाहनावर टिप्पर नेले. तर, जिल्हा परिषद अध्यक्षांचे वाहन हे एका बाजुला कमी वेगात असल्यामुळे त्यांना इजा झाली नाही. यानंतर या टिप्परमधील व्यक्तींनी खाली उतरून जिल्हा परिषद अध्यक्ष बेले यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

‘ मी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे’ असे बेले यांनी सांगितल्यावरही वाळू माफियांनी त्यांचे काहीही एक न ऐकता त्यांना बेदम मारहाण केली. या मारहणीमुळे बेले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तर, मारहाणीदरम्यान बेले यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकास मोबाईलवरून संपर्क साधल्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे यांच्यासह अनेकजण घटनास्थळाकडे येऊ लागताच, मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष बेले यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये ते उपचारासाठी दाखल झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. परंतू, याप्रकरणी वृत्त हाती येईपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचे दिसत आहे. भरदिवसा जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांना वाळू माफियांकडून होणारी बेदम मारहाण हे त्याचे उदाहरण आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार संतोष बांगर, जिल्हा परिषदचे सदस्य, सभापती यांनी अध्यक्ष गणाजी बेले यांची भेट घेतली.