रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती उत्तम कोळंबे आणि त्यांच्या दोन्ही साहाय्यकांना बुधवारी अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या तिघांनाही न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दीड लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात या तिघांनाही मंगळवारी अटक करण्यात आली होती.   कर्जत तालुक्यातील नेरळ येथील २३२ गुंठे जागेच्या बिनशेती प्रकरणाची फाईल रायगड जिल्हा परिषदेत प्रलंबित होती. या फाईलची पूर्तता करण्यासाठी कोळंबे आणि त्यांच्या दोन साहाय्यकांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. यात जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात वरिष्ठ साहाय्यक पदावर हेमंत चिंतामण म्हात्रे आणि विस्तार अधिकारी प्रसाद गोपीनाथ माळी या दोघांचाही समावेश होता. तडजोडीनंतर कोळंबे आणि त्यांच्या साथीदारांनी हे काम दीड लाख रुपयांत करण्याचे मान्य केले होते. ही लाचेची रक्कम स्वीकारताना, सभापती कोळंबे विस्तार अधिकारी माळी आणि वरिष्ठ साहाय्यक म्हात्रे या तिघांनाही नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.
  या तिघांनाही बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी या प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्थेत असल्याने, तसेच या प्रकरणात आणखीन काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? याचा तपास होणे गरजेचे असल्याचे सरकारी अधिवक्ता अ‍ॅड्. प्रसाद पाटील यांनी न्यायालयासमोर सांगीतले. तसेच आरोपींच्या आवाजाचे नमुने घेणे त्यांच्या मालमत्तेची चौकशी करणे गरजेचे असल्याने सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी त्यांनी या वेळी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या वेळी न्यायालय परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची कोंडी
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती उत्तम कोळंबे यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाल्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रकरणामुळे सेनेसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेत शेकाप आणि शिवसेनेची युती आहे. मात्र आता ही युती संपुष्टात आली आहे. अशातच येत्या २१ सप्टेंबरला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. नव्या राजकीय समिकरणांची बांधणी करून जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्याचा सेनेचा प्रयत्न सुरू आहे. नेमक्या याच वेळी कोळंबे यांच्या लाचखोरी प्रकरणामुळे शिवसेनेच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे. कोळंबे यांना कर्जत, खालापूर मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणूनही पाहिले जात होते. मतदारसंघ बांधणीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र लाच प्रकरणामुळे त्यांची स्वच्छ प्रतिमा धुळीला मिळाली आहे.
जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर
शिवतीर्थाच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या सभापतींनी लाच खोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सभापतींसोबत बांधकाम विभागातील विस्तार अधिकारी आणि वरिष्ठ साहाय्यकांना अटक झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे. अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींमधील साटेलोटे असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. लाचलुचपत विभागाने या प्रकरणात आणखीन काही अधिकारी आणि कर्मचारी यांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवल्याने हे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे.