News Flash

जिल्हा परिषद शाळेला ‘आयएसओ’ मानांकन!

‘आयएसओ’ मानांकन म्हटले, की एखादा उद्योग-व्यवसाय डोळय़ांसमोर उभा राहतो. पण सांगली जिल्हय़ात हे मानांकन चक्क एका शाळेने मिळवले आहे

| May 3, 2014 03:15 am

‘आयएसओ’ मानांकन म्हटले, की एखादा उद्योग-व्यवसाय डोळय़ांसमोर उभा राहतो. पण सांगली जिल्हय़ात हे मानांकन चक्क एका शाळेने मिळवले आहे आणि ही गुणवत्तेचे मानांकन मिळवणारी शाळादेखील जिल्हा परिषदेची सरकारी आहे.
सांगली जिल्ह्य़ाच्या पूर्व भागातील बेळंकीनजीक वाडीवस्तीवर १९८४ साली सुरू झालेल्या विकासनगर शाळेची ही यशोगाथा आणि या यशोगाथेचे किमयागार आहेत मनोज बळीराम बनकर हे शिक्षक!
औरंगाबादनजीक सातारा येथे एका बहुशिक्षकी शाळेने ‘आयएसओ’ मानांकन मिळवल्याची बनकर गुरुजींच्या वाचनात आले. याच वेळी त्यांनी आपल्या या शाळेलाही हे मानांकन मिळवण्याची जिद्द मनी बाळगली. या जिद्दीने पेटलेल्या बनकर गुरुजींनी आसपासच्या वाडीवस्तीवरील लोकांना एकत्र करून ही कल्पना सुरुवातीस मांडली आणि सारे ग्रामस्थच या कार्यात सहभागी झाले.
या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे ६४ विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतेक मुलांचे पालक शेतकरी व शेतमजूरच आहेत. ‘एक दिवस शाळेसाठी’ अशी घोषणा देऊन या साऱ्या पालकांनी शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला. शाळेच्या प्रत्येक सुधारणेसाठी अगोदर श्रमदान आणि मग उरलेल्या कामासाठी निधिसंकलन हे सूत्र ठरले. रोज कष्ट करावेत तेव्हा हातातोंडाची गाठ पडणाऱ्या या कष्टकरी समाजानेही या शाळेसाठी सुमारे ४ लाख ररुपये उभे केले. गावातील अण्णाप्पा भीमाप्पा गव्हाणे यांनी शाळेसाठी १० हजार चौरस फुटांचा भूखंड मोफत दिला. विकासनगरमधील परिवर्तनामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनीही मग सहकार्याचा हात पुढे केला. शिक्षणाधिकारी नामदेव माळी, सहकारी राजेंद्र िशदे यांनी लक्ष घालून विविध योजना शाळेपर्यंत पोहोचवल्या.
विकासनगरची ही शाळा दोन शिक्षकी आहे. चौथीपर्यंतचे वर्ग आणि दोनच शिक्षक, यावर बनकर गुरुजींनी मार्ग काढत चौथीच्या विद्यार्थ्यांमधील हुशार १६ मुले वेगळी करत त्यातील एकेका मुलास दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गटावर नेमण्यात आले. शिक्षणापेक्षा स्वयंअध्ययनावर या शाळेत भर दिला जातो. अभ्यासाबरोबर परिसर अभ्यासातून ही मुले जास्तीतजास्त शिक्षण घेण्याचे काम करतात. साधे शाळेपुढची बागदेखील विविध वनस्पतींची माहिती देणारी तयार करण्यात आली आहे. ही मुले गांडूळखत, शेती, संगणक शिक्षण आदी उपक्रमांतही सहभागी असतात. या प्रत्येक आकलनासाठी मुलांना ‘स्वाध्याय कार्ड’ देण्यात आलेले आहे. शाळेतच वृत्तपत्रांचे वाचनालय सुरु करण्यात आलेले आहे. यामध्ये दैनिकांचे वाचन तर घडतेच पण चालू विषयांवर मुलांमध्ये चर्चाही घडते.
इतिहास शिकताना या मुलांनी त्या काळात जावे म्हणून या शाळेच्या प्रांगणात सहय़ाद्री आणि त्यावरील पन्हाळय़ासारख्या किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मुलांचा केवळ शैक्षणिक विकास हे उद्दिष्ट न ठेवता क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही मुलांना प्रगत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत.
मुलांना चार िभतींच्या आत मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात वास्तवतेशी निगडित शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळेत होत आहे. टी.यू.व्ही. ऑस्ट्रिया कंपनीचे प्रतिनिधी राजू जन्नीहाल यांनी नुकतीच या शाळेला भेट देऊन त्यांना ‘आयएसओ मानांकन’ मिळाल्याची घोषणा केली. लवकरच जर्मनीहून अधिकृत प्रमाणपत्र शाळेला प्राप्त होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2014 3:15 am

Web Title: zp school gets iso certificate
टॅग : Zp School
Next Stories
1 ‘अतिक्रमणधारक-मनपातील संगनमताची चौकशी करावी’
2 ‘अतिक्रमणधारक-मनपातील संगनमताची चौकशी करावी’
3 गुन्हेगारांच्या जीपचा मालक फरार
Just Now!
X