तालासुरांची मफील जमली आणि नाचगाण्यात जिल्हा परिषद रंगली असे म्हणण्याची वेळ काल अलिबागकरांना आली. निमित्त होते ते रायगड जिल्हा परिषद येथे आयोजित गणेशोत्सव २०१५ कार्यक्रमाचे. कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी काम सोडून नाचगाण्याचा आस्वाद घेताना पाहायला मिळाले.
वास्तविक पाहता शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात धार्मिक सण आणि उत्सव साजरा करणे अपेक्षित नाही. मात्र तरीही रायगड जिल्ह्य़ात शासकीय कार्यालयांना असे सण आणि उत्सव साजरा करण्याची पंरपरा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय यासारख्या कार्यालयात गणेशोत्सवासारखे सण मोठय़ा जल्लोषात आणि उत्साहात साजरा केले जातात.
मात्र हे सण आणि उत्सव साजरे करताना दैनंदिन कामकाज खोळंबणार नाही याची खबरदारी घेणे अपेक्षित असते. मात्र उत्साहाच्या भरात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना याचा विसर पडतो. कर्मचाऱ्यांच्या या उत्साहाला जर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असेल तर मग जाब विचारणार तरी कोण याचा प्रत्यय मंगळवारी अलिबागकरांना आला.
रायगड जिल्हा परिषदेतील गणेशोत्सवाचे औचित्य साधून बुधवारी दुपारी अडीच वाजता म्युझिकल मेलोडी या ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चला हवा येऊ द्या फेम सागर करंडे आणि संदीप गायकवाडसारख्या कलावंतांनी हजेरी लावली. एवढेच नव्हे तर बहारदार गीतांबरोबर लावणीही सादर करण्यात आली. शासकीय कामकाज थांबवून जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकारी यावेळी नाचगाण्याचा आस्वाद घेताना दिसले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
रायगड जिल्ह्य़ात गणेशोत्सव घराघरात साजरा होत असतो. त्यामुळे गौरीगणपती विसर्जनापर्यंत शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तुरळक हजेरी असते. त्यामुळे या कालावधीत कार्यालयीन कामकाज बाधित होत असते. अशातच कामकाजाच्या वेळेत मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याने कामकाज ठप्प होत. बुधवारी याचाच अनुभव जिल्ह्य़ातील विविध भागातून आलेल्या नागरिकांना आला. कार्यालयीन वेळेत तब्बल तीन तास अधिकारी आणि कर्मचारी नाचगाण्याच्या कार्यक्रमात दंग असल्याचे दिसून आले.
अलिबागमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातही गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सव काळात विविध सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. मात्र हे सर्व कार्यक्रम कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर रात्री सात ते दहा या वेळेत आयोजित करण्यात येतात. जिल्हा परिषदेने गणेशोत्सव साजरा करावा अथवा नाही याचा निर्णय त्यांनीच घ्यावा. मात्र हा उत्सव साजरा करताना शासकीय कामकाज बाधित होणार नाही याची खबरदारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यावी एवढी माफक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.