नीलेश पानमंद / ऋषीकेश मुळे

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्यामुळे जिल्ह्य़ातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर उमेदवारांनी समाजमाध्यमांद्वारेही जोरदार प्रचार सुरू केला आहे. ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या, तर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मतदारसंघातील समस्यांच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या आहेत. तसेच काही उमेदवारांच्या गाण्याच्या चित्रफिती प्रसारित झाल्या आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रचाराचा आखाडा बनल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी मतदारसंघात केलेल्या कामांची चित्रफीत प्रसारित केली असून त्याद्वारे हक्काचा माणूस अशा प्रकारचा संदेश दिला जात आहे. तसेच केळकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याही चित्रफिती तयार केल्या आहेत. मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वाहतूक कोंडी समस्या, पोलीस वसाहत इमारतीची दुरवस्था, गुजराती-मराठी वाद, त्यांच्या कामाबद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा चित्रफितींचा समावेश आहे. याशिवाय, एका महिलेला तिचे बाळ परत मिळवून देतानाच्या भावनिक चित्रफितीचाही समावेश आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी समूह विकास प्रकल्पास मिळालेली मंजुरी, मेट्रो प्रकल्प, सॅटिस पूर्व प्रकल्प, बारवी धरणातून मिळालेले अतिरिक्त पाणी आणि जलवाहतूक यांसारख्या कामांच्या चित्रफिती प्रसारित केल्या आहेत. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी ‘एक हात, एक नाथ’ असे गाणे त्यांच्यावर तयार करण्यात आले आहे. प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे उमेदवार संजय घाडीगावकर यांनी समूह पुनर्विकास, वाहतूक कोंडी अशा मुद्दय़ांवर चित्रफिती तयार केल्या आहेत.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या पारसिक चौपाटी, कब्रस्तान तसेच अन्य विकासकामांच्या चित्रफिती प्रसारित झाल्या असून प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांच्या समस्या आणि विजयी भवच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर दिसून येत आहेत. तसेच डोंबिवली विधासनभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांच्याकडूनही समाजमाध्यमांवर प्रचाराच्या विविध चित्रफिती आणि फलकांद्वारे प्रचार केला जात आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनीही मतदारसंघातील समस्यांच्या चित्रफिती प्रसारित केल्या आहेत.

प्रचारगीतांतून मतदारांना हाक

ओवळा-माजिवाडा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांची मेट्रो तसेच अन्य विकासकामांची चित्रफीत समाजमाध्यमांवर दिसत असून सरनाईक यांचे ‘विकासाची भेट जेव्हा झाली प्रतापाशी’ हे गाणेही प्रसारित झाले आहे. ‘लोकांच्या गळ्यातील ताईत.. सरनाईक’ या ओळी ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचारात पुन:पुन्हा वाजविल्या जात आहेत. या ठिकाणी प्रतिस्पर्धी असलेले विक्रांत चव्हाण यांच्या प्रचाराच्या चित्रफिती दिसून येत आहेत. शहापूर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांचेही गाणे समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे.