‘आमचं ठरलंय’ असे सांगून निवडणुकीत युती करणाऱ्या शिवसेना-भाजपमधील स्थानिक पातळीवरील संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे सपुर्द केले आहेत. जागावाटपावरून ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदाच्या निवडणुकीत सेना-भाजपाची युती झाली असली तरी नाराजी आणि बंडखोरीचा फटका बसत असल्याचे पहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेमधून नाराजीचा सूर समोर आला आहे. तिकीट वाटपावरून स्थानिक नेत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आज सकाळी २६ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. या नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने शिवसेनेसह भाजपाच्याही अडचणी वाढल्या आहेत. स्थानिक नेता धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ सर्वांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभेची उमेदवारी शिवसेनेच्या नेत्याला मिळावी अशी या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली. त्यामुळे बोडारे समर्थकांची नाराजी समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील १८ मतदारसंघांपैकी काही अपवाद वगळले तर जवळपास प्रत्येक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयातील दरी अगदी स्पष्टपणे जाणवत आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिम या मतदारसंघांत या दोन्ही पक्षांत उघडपणे बंड झाल्याने त्याचे पडसाद आता जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या मतदारसंघांत पाहायला मिळू लागले आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर येथील नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केल्याने भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड दुखावले गेले आहेत. बोडारे हे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिंदे यांचे पाठबळ असल्याशिवाय बोडारे बंड करणे शक्यच नाही, असा गायकवाड समर्थकांचा होरा आहे. त्यामुळे बोडारे यांची बंडखोरी होताच गायकवाड यांनी थेट पालकमंत्र्यांवर टीकेचे आसूड ओढले. त्यानंतर येथे शिवसेनेची फळी अधिक ताकदीने बोडारे यांच्यामागे उभी राहिल्याचे चित्र आहे.

(आणखी वाचा : सेना-भाजपाला बंडखोरांचा फटका? ३० जागांवर विरोधकांना फायदा होण्याची शक्यता )