संजय बापट

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील( क्रिटिकल) म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३५० तुकडय़ांसह सुमारे तीन लाख पोलिसांचा बंदोबस्त राज्यभरात तैनात करण्यात आला आहे. आतापर्यंत ३३ उमेदवारांसह १७७९ जणांविरोधात आचारंसहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतून ६० किलो सोने आणि ५८ किलो चांदी जप्त करण्यात आली असून मतदानाच्या तोंडावर हे सोने कोठे नेले जात होते याच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक  ६६१ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून त्या  खालोखाल ३२५ मतदान केंद्रे मुंबई शहर जिल्ह्य़ात तर २५२ मतदान केंद्रे पुणे जिल्ह्य़ात आहेत. अमरावती जिल्ह्य़ात २१७,  गोंदियात १२६, औरंगाबादमध्ये १००, नाशिक ९६, वाशिमला ८५, सोलापूर ८७, तर बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्य़ांत ५० ते ५५ च्या दरम्यान मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून या ठिकाणच्या मतदान प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. विशेष म्हणजे नक्षलप्रभावीत गडचिरोलीसह वर्धा, बुलढाणा, अहमदनगर आणि मुंबई उपनगर जिल्ह्य़ांत एकही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेले नाही.

शिवसेना आणि भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांच्यात कणकवली मतदारसंघात अटीतटीची लढत होत आहे. हा संपूर्ण मतदारसंघच संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी शिवसेनेने आयोगाकडे केली आहे.

५२ कोटीसह १४२ कोटींचा मुद्देमाल जप्त : प्रचारादरम्यान  ५२.६९ कोटी रुपयांच्या रोकडसह १४२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी सांताक्रूझ विमानतळाच्या परिसरातून कॉन्कोर कुरिअर कंपनीच्या इसमाकडून २२.८९ कोटी रुपये रकमेचे ६० किलो सोने आणि ५८ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय ३१ कोटी ५२ लाख रुपये किमतीची दारू, २० कोटी ७१ लाखांचे मादक पदार्थ आणि ४७ कोटी ६४ लाखाचे सोने- चांदी- हिरे याचा समावेश आहे. शनिवारी ठाण्यात अपक्ष उमेदवार रमेश कदम यांना कारागृहाऐवजी मित्राच्या घरी घेऊन जाणाच्या प्रकरणात संबंधित पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे संकेत आयोगाने दिले आहेत. याबाबत अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करताना केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून नव्हे तर आयोगाचे अनेक निकष लक्षात घेऊन तसेच पोलिसांचा अहवाल याचा विचार केला जातो. काही ठिकाणी एकाच ठिकाणी अधिक मतदान केंद्रे असतात अशा ठिकाणी होणारी मतदारांची गर्दी लक्षात घेऊनही तेथील मतदान केंद्रे संवेदनशील (क्रिटिकल ) म्हणून जाहीर केली जातात.

– दिलीप शिंदे, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी