मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राज्यातील २८८ मतदारसंघांत एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिपळूणमध्ये सर्वात कमी तीन उमेदवार असून मराठवाडय़ात नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक ३८ उमेदवार नशीब आजमावत आहेत.

विधानसभेच्या २८८ मतदारसंघात एकूण ५५४३ अर्ज दाखल झाले होते. त्रुटी आढळल्याने ७९८ अर्ज अवैध ठरले. तर ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी तीन वाजता संपल्यानंतर आता राज्यातील २८८ मतदारसंघात ३२२९ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. म्हणजेच राज्यातील २८८ मतदारसंघात एकूण १५०० उमेदवारांनी माघार घेतल्याचे स्पष्ट होते.

राज्यात नांदेड जिल्ह्य़ातील भोकर या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण रिंगणात असलेल्या विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर केवळ सात उमेदवार रिंगणात उरले. चिपळूणमध्ये सर्वात कमी तीन तर नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक ३८ उमेदवार रिंगणात आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद पूर्वमध्ये ३४ तर जालन्यात ३२ उमेदवार रिंगणात आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

१२ कोटींची दारू व १५ कोटींचे अमली पदार्थ

निवडणूक काळात आतापर्यंत ११ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर १२ कोटी ४७ लाख रुपयांची दारू जप्त झाली आहे. त्याचबरोबर १५ कोटी ३९ लाख रुपयांचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. सोने व चांदी मिळून ८ कोटी ८७ लाख रुपयांचे मूल्यवान धातू जप्त करण्यात आल्याची माहिती दिलीप शिंदे यांनी दिली.