४६ मतदारसंघांत ६७४ उमेदवार; मोजकेच बंडखोर रिंगणात

औरंगाबाद : मराठवाडय़ात  बंडांचे निशाण फडकविलेल्या प्रमुख उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली. माघारीचा हा वेग भोकर मतदारसंघात एवढा अधिक होता की, एका दिवसात ८४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात काँग्रेसकडून अशोक चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मराठवाडय़ातील ४६ मतदारसंघांत ६७४ उमेदवार आता रिंगणात आहेत. यात मोजक्याच ठिकाणी बंडखोरी दिसून येत आहे. औरंगाबाद पश्चिम, वसमत, नांदेड दक्षिण, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील चारही मतदारसंघांत बंडखोर आहेत.

लातूर जिल्ह्य़ात भाजपमध्ये अधिक बंडखोरी होईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात औरंगाबाद ग्रामीण मतदारसंघातून रमेश कराड, औसा मतदारसंघातून दिनकर माने, उदगीर मतदारसंघातून सुधाकर भालेराव यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. सहा मतदारसंघांत आता ७९ उमेदवार रिंगणात आहेत. कळमनुरी मतदारसंघातही बंड थोपविण्यात शिवसेनेला यश आले. तर वसमतमध्ये मात्र भाजपचे अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने सुरेश पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

सिल्लोडमध्ये सर्वात कमी उमेदवार

* औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा कार्यकर्ता अशी ओळख असणारे राजू शिंदे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

* औरंगाबाद मध्यमधून किशनचंद तनवाणी, औरंगाबाद पूर्वमधून राजू वैद्य यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले.

*  राज्यमंत्री अतुल सावे यांच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक ३४ उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वात कमी सात उमेदवार सिल्लोड मतदारसंघात आहेत.

गंगाखेड, जिंतूरमध्ये पेच

नांदेड जिल्ह्य़ातील नऊ मतदारसंघांत सोमवारी १९३ जणांनी माघार घेतली. नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात हदगाव मतदारसंघात बंडखोरी झाली असून नांदेड उत्तरमध्येही भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी बंडखोरी केल्याचे आज स्पष्ट झाले.  गंगाखेड व जिंतूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे त्रांगडे झाले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी  गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रत्नाकर गुट्टे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक िरगणात राहिला आहे. तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात रासपच्यावतीने ज्यांची उमेदवारी सुरुवातीला जाहीर करण्यात आली त्या मेघना बोर्डीकर यांनी भाजपचाच ’बी फार्म’ सोबत जोडल्याने आता त्या रासपच्या नसून थेट भाजपच्याच उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, या मतदारसंघात शिवसेनेचे विधानसभाप्रमुख राम खराबे पाटील यांचाही उमेदवारी अर्ज राहिल्याने या मतदारसंघात महायुतीला छेद दिला गेला आहे.