राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत काही बोलण्यास नकार दिलेला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. हे सर्व पाहता राजकीय चर्चांना उधान आलं आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी या भेटीचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये असे सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी राज्यात मोठ्याप्रमाणावर हालचाली सुरू होत्या, त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे मराठवाडा,विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी परतीच्या पावासामुळे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले, याची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असली तरी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. राज्यातील शेतकऱ्यांना सरकार स्थापन झालेले नसल्याने ज्या काही मदतीची आवश्यकता आहे. या मदतीसंदर्भातच आज ही भेट होत असावी असे मला वाटते. या भेटीमागे अन्य काही बाबी असतील असे मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या भेटीमागे कोणताही राजकीय अन्वयार्थ काढला जाऊ नये, असे खासदार तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलतान सांगितले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उद्या दुपारपर्यंत सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरर बोलताना तटकरे म्हणाले की, मुंबईत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठका झाल्या आहेत. किमान समान कार्यक्रमाचा आराखडा तयार झालेला आहे. आज राष्ट्रीय पातळीवरची बैठक होणार आहे. या बैठकीत चर्चेअंती या आराखड्यास अंतिम स्वरूप दिले जाईल व त्यानंत दोन्ही पक्ष श्रेष्ठींच्या सूचनेनुसार पुढील हालचाली होतील.

भाजपा-राष्ट्रवादीतही काही चर्चा सुरू आहे का? या प्रश्नावर बोलताना असं माझ्यातरी काही कानावर नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील सत्तास्थापनेच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज सायंकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे.