हृषीकेश जोशी, अभिनेता व लेखक

* निवडणुकीत मुख्य मुद्दे कोणते?

प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगळे आहेत. शिक्षणाचा मुद्दा सार्वत्रिक आहे. त्यातील प्रश्न कसे सोडवायचे, सुसूत्रीकरण कसे होईल हे पाहावे लागेल. पाऊस खूप झाल्यामुळे त्या भागातील समस्या वाढल्या, त्याचबरोबर पाऊस नाही तेथील समस्या तशाच राहिल्या आहेत.  मुंबईतील राजकारण्यांना रस्त्यांची परिस्थिती जाणवत का नाही? हा मुद्दा महापालिकेचा म्हणून सोडून देण्यापेक्षा हे काम करून घ्यावे लागेल. किमान रोजचं दळणवळण सुकर व्हावं इतकी अपेक्षा आहे.

* या मुद्दय़ांना राजकीय पक्ष भिडतात असे वाटते का?

निवडणूक लढवण्यासाठी कोणते मुद्दे घ्यायचे हा राजकीय पक्षांच्या तांत्रिक कौशल्याचा भाग झाला आहे. भाजप हा ताकदवान असल्यामुळे त्यांच्याकडून राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न हाती घेतले जात आहेत. राज्याचे प्रश्न त्यापेक्षा खूप निराळे आहेत. भाजप राष्ट्रीयत्वाच्या मुद्दय़ावर बोलत असेल, तर विरोधकांनी किमान झुंडशाहीच्या मुद्दय़ावर प्रश्न विचारायला हवे; पण तेदेखील बोलत नाहीत. पक्षांतर केलेल्यांचे आधीच्या पक्षातील मुद्दे वेगळे होते, धोरणे वेगळी होती, त्यांना राष्ट्रीयत्वाचा मुद्दा घेतल्याशिवाय प्रचार करता येणार नाही.  आरेच्या मुद्दय़ावरील विरोधकांचे बोलणे हे केवळ भाजपला विरोध या स्वरूपाचे आहे.

* तुम्ही उमेदवार असता तर प्राधान्य कशाला असेल?

मी ज्या मतदारसंघाचा आहे तेथील स्थानिक मुद्दय़ांना अधिक प्राधान्य असेल. मी कोल्हापूरचा आहे, तेथून निवडणूक लढवताना त्या भागात गेल्या काही वर्षांत स्थानिक पातळीवर झालेले जातीय ध्रुवीकरण कसे मिटवता येईल याचा विचार असेल. सलोखा आणि शांतता लोकांमधून नाहीशाच झाल्या आहेत. या वेळच्या महापुराने बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. महत्त्वाचे म्हणजे रोजच्या रोज देशप्रेम व्यक्त करून रोजच्या समस्या मिटवता येणार नाहीत हे लक्षात घ्यावे लागेल.

* नवमतदारांना काय संदेश द्याल?

भावनेच्या आहारी जाऊन मतदान करण्यापेक्षा आपल्या तत्त्वासाठी मतदान करावे. त्यासाठी आधी तत्त्व कोणते हे ठरवावे लागेल. या तत्त्वाचा पाया भक्कम नसेल तर त्या बाबी वरचेवरच राहतील.

संकलन – सुहास जोशी