30 October 2020

News Flash

निवडणुकीत म्हणींचा मराठवाडी ठसका !

‘मामुली’, ‘हाबाडा’ आणि ‘भरारी’ शब्दांसह घोषवाक्यांची जुळवणी

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

गेल्या विधानसभा निवडणुकीत दूरचित्रवाणी संच सुरू केला की मिनिटा-मिनिटाला एक घोषवाक्य ऐकू यायचे, ‘कुठे नेऊन ठेवला आहे, महाराष्ट्र माझा?’ तो प्रश्न मनात पेटता राहावा अशी रचना तेव्हा होती. पण मराठवाडय़ाच्या निवडणुकीत काही शब्द आणि काही घोषवाक्य अशी काही पेरली गेली की त्यातून निवडणुकांचे निकालही बदलले. तशा काही म्हणी अगदी नेहमीच वापरल्या जातात. त्यात ‘खान की बाण’ मराठवाडय़ात अधिक असते. हिंदू-मुस्लीम राजकारणाचे टोकदार रूप परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्य़ात अधिक असते. तेथे हे शब्द आवर्जून वापरले जातात. ‘हबाडा’ हा खास मराठवाडी शब्द निवडणुकीमधला. ‘मामुली’ या शब्दाने निवडणुकांचे निकालदेखील फिरविले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्य़ात ‘भरारी’ नावाचा देशी दारूचा एक ब्रॅण्ड होता. तेरणा साखर कारखान्यात तो तयार होत असे. निवडणूक आली की मतदारांपर्यंत आवर्जून सांगितले जायचे, ‘आली रे आली भरारी आली.’ हेच घोषवाक्य विरोधक उपहासाने म्हणायचे. बीड जिल्ह्य़ातील राजकारणाला जातीय किनार नेहमीच मिळते. त्यात सरदार विरुद्ध भाजपचा कार्यकर्ता अशी लढत असे. विशेषत: गोपीनाथ मुंडे ओबीसी समाजाचे नेतृत्व करत असल्यामुळे ‘वाजवा तुतारी आणि पाडा .. असे घोषवाक्य सर्रासपणे वापरले जायचे. त्यातील जातिवाचक उल्लेख निषेधार्ह असले तरी ते निवडणुकीत हे शब्द म्हणी व्हाव्यात एवढय़ा त्याच्या वापराची वारंवारिता होती. असाच जातिवाचक शब्द लातूरचे राजकारण बदलविणारा होता. विधानसभेच्या निवडणुकीत विलासराव देशमुखांना ‘मामुली’ शब्दामुळे पराभव पत्करावा लागला होता. ‘मा-मु-ली’ या शब्दाची फोड करत ‘मारवाडी-मुस्लीम आणि लिंगायत’ अशी करण्यात आली आणि विलासराव या तीनही जातिधर्मातील व्यक्तींना मामुली ठरवत आहे, असा प्रचार केला गेला आणि शिवाजीराव पाटील कव्हेकर निवडणुकीत विजयी झाले होते. असाच एक शब्द ‘हबाडा.’ विरोधकाला पराभूत करण्यासाठी केजचे प्रतिनिधित्व करणारे नेते बाबूराव आडसकर हा शब्द वापरत असत. ‘जोराचा धक्का’ असा ‘हबाडा’चा अर्थ लावला जात असे.

‘धोंडग्यांचा गाडा, मुंबईला धाडा’ असा वाक्यप्रचार केला जात असे. धोंडगे यांचे चिन्ह ‘गाडा’ असे होते. सरकारी भाषेत त्याला ‘खटारा’ असे म्हटले जायचे. १९९०च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांविरुद्ध निवडणूक लढविणाऱ्या नागनाथ गीते नावाच्या उमेदवाराने ‘आया तराजू, हट जा बाजू’ असा प्रचार केला होता. त्यांचे चिन्ह ‘तराजू’ होते. पूर्वी चिन्ह पोहोचावे यासाठी खासे प्रयत्न करावे लागायचे. त्यातून ‘गाय वासरू, नका विसरू’ हे घोषवाक्य प्रत्येकाच्या मनात आजही घर करून आहे. मग प्रचार सुरू व्हायचा, ‘ताई-माई अक्का, विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का.’ सेनेतले नेते घोषणा द्यायला मोठा पुढाकार घेतात. त्यांची एक घोषणा सर्वाच्या लक्षात राहते, ‘अबब, ही काय गोष्ट, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.’ ‘अब की बांधो गाँठ, पिछडा पावे सौ में साठ’ अशी घोषणा समाजवादी मंडळी देत असत. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा जनसंघ होता तेव्हा ‘जनसंघाचा दिवा, घरोघरी लावा’ असे घोषवाक्य भिंतीवर लिहिले जायचे. आता समाजमाध्यमातून एवढय़ा प्रकारची टीका यमकाच्या आधारे केली जाते की, या जुने घोषवाक्य, म्हणी काही वेळा अर्थहीनही वाटू शकतील. अलीकडेच ‘नको आमदार, हवा कामदार’ अशी म्हणही विकसित केली जात आहे. या निवडणुकीचा प्रचार समाजमाध्यमामधूनच अधिक होणार असल्याने यमक जुळवून नवनवे घोषवाक्य तयार होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2019 12:35 am

Web Title: adage use in election publicity abn 97
Next Stories
1 औरंगाबादमधील तिन्ही जागांसाठी एमआयएमचे उमेदवार जाहीर
2 औरंगाबाद : अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; उपचार न मिळाल्याने मृत्यू
3 एकतर्फी प्रेमातून औरंगाबादमध्ये तिहेरी हत्याकांड
Just Now!
X