News Flash

…आणि वाढली आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याची शक्यता

भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं ठरवलं तर...

(संग्रहित छायाचित्र)

– योगेश मेहेंदळे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे कल जसे हातात येत आहेत ते बघता, भारतीय जनता पार्टीला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेवर अवलंबून रहावे लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजपा अंदाजे ११३ जागांवर शिवसेना ७३, राष्ट्रवादी ५०, काँग्रेस ३७ व इतर पक्ष १४ जागांवर आघाडीवर आहेत. प्रेमात व युद्धात सगळं क्षम्य असतं हे तत्व भारतीय राजकारणात लागू पडत असल्यामुळे व राजकारण युद्धाप्रमाणेच लढण्यात येत असल्यामुळे सत्ताग्रहणासाठी सगळे राजकीय पक्ष काहीही करणं शक्य आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला जवळ करण्याचं ठरवलं व भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं मान्य केलं तर शिवसेना व काँग्रेस आघाडी सहजरीत्या सरकार स्थापन करू शकतात कारण त्यांच्या जागांची संख्या १४४च्या पार आहे.

आदित्य ठाकरेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेताना उद्धव ठाकरेंच्या मनात नक्कीच काही आडाखे असतील. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या राजकारणात उतरवताना त्यानं मुख्यमंत्रीपदीच बसावं असं स्वप्न शिवसेना पक्षप्रमुखांनी बाळगणं गैर नाही. तर ज्या प्रकारे काँग्रेस व राष्ट्रवादी सगळ्या स्तरांवर राजकारणाच्या बाहेर फेकले गेले आहेत ते बघता पक्षांची मरगळ झटकण्यासाठी सत्तेत जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला तर त्याला गैर मानता येणार नाही. या शक्यतेची झलक काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दाखवलीच आहे. त्यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेसची प्राथमिकता असेल असे सूचक ट्विट केले आहे.

जर राजकीय शूचितेचा विचार केला तर या कुठल्याही पक्षांना अशा कुठल्याही बाबीचा अडसर नसल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. गेल्याच निवडणुका शिवसेनेनं स्वतंत्र लढवल्या होत्या. त्यावेळी फडणवीसांचं पहिलं सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत आलं होतं, ज्यांना नंतर शिवसेना येऊन मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादीचं जेवढं भाजपाशी वैर आहे तेवढं वैर शिवसेनेशी नाही. त्यामुळे आपल्याऐवजी शिवसेनेचे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील या दु:खापेक्षा भाजपा विरोधी पक्षात बसला तर त्याचं सुख काँग्रेस आघाडीसाठी मोठं असेल.

जर तशीच वेळ आली तर कदाचित असंही होऊ शकतं की विरोधात बसण्यापेक्षा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपा सत्तेत राहील. लहान भाऊ कोण, मोठा भाऊ कोण या लढाईमध्ये कमी जागा मिळालेल्या शिवसेनेसाठी जड अंत:करणानं मुख्यमंत्रीपद सोडलंही जाऊ शकतं. राष्ट्रवादी पक्षानं जास्त जागा जिंकूनही कमी जागा जिंकलेल्या काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलेलंही आपण यापूर्वी बघितलेलं आहे. लवकरच स्पष्ट होईल की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सत्तेत सहभागी होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2019 10:47 am

Web Title: aditya thackeray chief minister possibility
Next Stories
1 रिमेकची खेळी
2 BLOG : अदखलपात्र राज ठाकरे
3 विशेष लेख : कोल्हापूरच्या लालमातीचे भूषण – दादू चौगुले
Just Now!
X