गेल्या चाळीस वर्षांपासून जास्त काळ राजकारणात असलेल्या आणि समाजकारण करणाऱ्या काकांवर ईडीने गुन्हा दाखल केला त्यामुळे आपण अस्वस्थ झालो आहोत असं अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं. इतकंच नाही तर आपण राजकारण सोडून देऊ शेती किंवा व्यवसाय करु असाही सल्ला अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना दिला. ही माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या वृत्तासंदर्भात ते बोलत होते.

अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला पुण्याला येताना समजली. त्यानंतर मी अजित पवार यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यावेळी अजित पवार यांनी कुटुंबीयांना त्यांची अस्वस्थता बोलून दाखवली. अजित पवार म्हणाले की राजकारणाची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे.  आपण राजकारण सोडून देऊ त्यापेक्षा शेती किंवा व्यवसाय केलेला बरा असं अजित पवार यांनी मुलांना सांगितलं ” अशी माहिती शरद पवारांनी दिली.

आता शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जे सांगितलं त्यावरुन अजित पवार हे राजकीय संन्यास घेणार की काय? अशा चर्चा सुरु झाल्या. त्याबाबत शरद पवार यांना प्रश्नही विचारण्यात आला. ज्याबाबत शरद पवार असं म्हणाले की, ” अजित पवार यांनी राजीनामा का दिला हे मलाही जाणून घ्यायचं आहे. मात्र ईडीने माझ्यावर जो गुन्हा दाखल केला त्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थेतून त्यांनी हा राजीनामा दिला असावा. त्यांच्या राजीनाम्याबाबत मला कल्पना नव्हती. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी तुमच्या प्रश्नांचं उत्तरं देऊ शकेन ”

त्याचसोबत शरद पवार यांना पवार कुटुंबातील अंतर्गत कलहामुळे अजित पवार यांनी राजीनामा दिला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, ” पवार कुटुंबात कोणतेही अंतर्गत कलह नाहीत. आम्ही सगळे एक आहोत. कुटुंबप्रमुख म्हणून मी अजित पवारांशी चर्चा करणार आहे. मात्र पवार कुटुंबात कोणतेही कलह किंवा मतभेद नाहीत आमच्या कुटुंबात कुटुंबप्रमुखाचा शब्द अंतिम असतो. त्यामुळे अशा काही चर्चांना अर्थ नाही. अजित पवार यांनी राजीनामा का दिला हे मलाही जाणून घ्यायचं आहे. मात्र जे गलिच्छ राजकारण सुरु आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा असा माझा अंदाज आहे”

अजित पवार यांनी राजीनामा का दिला असावा? याचं कारण त्यांनी सांगितल्यावर स्पष्ट होईल तूर्तास तरी शरद पवार यांनी जी चर्चा सांगितली त्यावरुन अजित पवार राजकीय संन्यास तर घेणार नाही याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.