शरद पवार यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उगारुन दूर गेलेले अजित पवार हे तीन दिवसात शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचले. सुप्रिया सुळे या ठिकाणी होत्या. या घराचे दरवाजे अजित पवारांसाठी उघडे होते. अत्यंत तत्परतेने अजित पवार कारमधून उतरुन या घरात गेले. त्यांनी हे असं शरद पवारांच्या घरात जाणं याचा अर्थच ते बंड मागे सोडून आता पुढे आले आहेत असा होतो असंही मत काही राजकीय विश्लेषकांनी मांडलं. आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास तरी अजित पवार यांची घरवापसी झाली आहे असंच म्हणता येईल. दृश्यं तरी हेच सांगत आहेत.

शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत अजित पवार यांनी सगळ्या महाराष्ट्राला धक्का दिला होता. कारण भाजपासोबत जात त्यांनी ही शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधला आमदारांचा एक मोठा गट फोडला असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र त्यांच्यासोबत जाणारे सगळे आमदार रविवारी संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीमध्ये परतले. अजित पवारांच्य मनधरणीचे प्रयत्नही सुरु होते. अखेर आज म्हणजेच मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांंनी राजीनामा दिल्याने भाजपाचं सरकार कोसळलं आणि देवेंद्र फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नऊ तासांनी अजित पवार हे सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी परतले आहेत.