सत्ताधाऱ्यांच्या काळात शेतकऱ्यांना संप करावा लागला. नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एफआरपी प्रमाणे भाव मिळावा म्हणून आंदोलन केले तर गोळीबार केला. शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणारे हे सत्ताधारी आहेत असे म्हणत अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, यांच्या काळात शेतकऱ्यांना संप करावा लागला. नगर जिल्ह्यात नेवासा येथे एफआरपी प्रमाणे भाव द्या म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तिथं गोळीबार केला. शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणारी हि लोक आहेत. संप करायला लावणारे हे लोक आहेत.  शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करायला लावणारं हे सरकार आहे, असे म्हणत अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. पुढे म्हणाले की, भाजपा पक्ष हा केवळ बोलघेवड्यासारखा बोलत असतो. पाच वर्षांपूर्वी अच्छे दिन चे स्वप्नं दाखवली. प्रत्येक्षात मात्र स्वप्नं साकार झाली नाहीत असं पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले की, भाजपाच्या २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुरावे दिले होते. तरी ही अनेकांना त्यांनी क्लीनचिट दिली. एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, प्रकाश मेहता यांना तिकीट का नाकारले हे नागरिकांना कळू द्या. तुमचा कारभार एवढा चांगला होता तर यांना का तिकीट नाही दिल?  असा सवाल ही त्यांनी सत्ताधारी भाजपाला केला.

ईव्हीएममध्ये नव्हे बोटात घोटाळा आहे-अजित पवार

आंदोलकांना आधीच पोलीस उचलून नेतात असं म्हणत एका नागरिकाने ही हिटलरशाही आहे असं म्हटलं. यावर अजित पवार म्हणाले हुकूमशाही आहे हिटलरशाही आहे तेच चाललं आहे. खाली बसलेल्या आणखी एकाने ही तानशाही आहे असं म्हटलं यावर पुन्हा अजित पवार म्हणाले, काय म्हणायचं ते म्हणा फक्त त्यांना मत देऊ नका. नाहीतर आम्ही घसे कोरडे करतोय आणि पुन्हा म्हणायचं ईव्हीएम मशीनमध्येच घोटाळा आहे. अरे पण तुझ्या बोटातच घोटाळा आहे त्याच काय तुझं बोट तिकडं जातंय असं म्हणतात उपस्थितांमध्ये हशा पिकला.