राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून गळती लागली आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. “मागील काही दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक नेत्यांनी पक्षांतर करण्याचे काम केले आहे. जे पक्षातून गेले आहे. त्यातील कोणाचाही विचार करीत बसू नका. घोटाळे बाहेर येऊ नये, म्हणून सर्वांनी पक्षांतर केले आहे,” असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा अजित पवार यांच्या अध्य़क्षतेखाली रविवारी पार पडला. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, प्रवक्ते अंकुश काकडे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर टीका केली. अजित पवार म्हणाले की, “केंद्रात आणि राज्यात युपीएचे सरकार असताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले. या काळात केंद्र सरकारकडून राज्यातील अनेक भागात हजारो कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्याचे काम केले. पण मागील पाच वर्षात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार राज्यात नव्या योजना आणण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढले. यावर सरकार कोणत्याही उपाय योजना करताना सरकार दिसत नाही. सरकारच्या अपयशामुळे कुठे नेऊन ठेवला आहे, महाराष्ट्र माझा अशी म्हणायची वेळ आली आहे,” अशी टीका पवार यांनी केली.

पुढे म्हणाले अजित पवार म्हणाले, “केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सहा वर्ष झाली आहेत. तर राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाच वर्ष झाली आहे. या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचे भाजपाकडून सांगितले जात आहे. मात्र, कुठेही विकास दिसत नाही. विकास नावाच्या घोषणेला आता सहा वर्ष झाली. आता तरी विकासचा चेहरा दाखवा,”असा टोला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लगावला.

“मागील काही दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक नेत्यांनी पक्षांतर करण्याचे काम केले आहे. जे पक्षातून गेले आहे. त्यातील कोणाचाही विचार करीत बसू नका. आता कामाला लागा. बरं झालं ते सगळे गेले. तिथे जाऊन काय अवस्था झाली. ते आपण सर्वजण पाहतो आहोत. आता ते सर्व बाहेर गेल्यामुळे तरुणांना संधी मिळण्यास मदत झाली आहे. घोटाळे बाहेर येऊ नये, म्हणून सर्वांनी पक्षांतर केले आहे. एवढचं लक्षात ठेवा,”अशा शब्दात अजित पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री साहेब, एवढ लक्षात ठेवा

पुन्हा मुख्यमंत्री होणार, असं देवेंद्र फडणवीस सभेत बोलताना म्हणाले होते. त्यावर अजित पवार म्हणाले, “मी पुन्हा येईल. मी पुन्हा मुख्यमंत्री, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस साहेब चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात. त्यामुळे तुम्ही एवढ गृहीत धरू नका, एवढ लक्षात ठेवा,” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना पवार यांनी टोला लगावला.