राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. अजित पवारांनी कोणतंही कारण न देता राजीनामा दिला आहे. अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचे बागडे यांनी सांगितले. “माझ्या विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा मी देत आहे असा फोन अजित पवार यांनी स्वतःहून मला केला म्हणून मी तो मंजूर केला असं बागडे यांनी सांगितले.” तसेच कुठलंही कारण त्यांनी दिलेलं नाही असंही ते म्हणाले.

अजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह ७० जणांची नावं २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ज्यामध्ये शरद पवार यांचंही नाव होतं. आज दिवसभर शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार ही बातमी चर्चेत होती. मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगत शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार हे त्या शिखर बँकेच्या संचालक मंडळावर होते. या घोटाळ्यामध्ये शरद पवारांचा संबंध असू शकत नाही कारण ते ना संचालक होते, ना सभासद होते असे सर्वांनीच स्पष्ट केले होते. मात्र कुणीही अजित पवार  यांच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले नव्हते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.

काय होता शिखर बँक घोटाळा?

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. यामध्ये २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप आहे. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते.

जाणून घ्या कसे झाले राज्य सहकारी बँकेचं नुकसान?

संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केलं

नऊ साखर कारखान्यांना ३३१ कोटींचा कर्जपुरवठा

गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना ६० कोटींचे कर्ज

केन अ‍ॅग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं ११९ कोटींचा तोटा

२४ साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, २२५ कोटींची थकबाकी

२२ कारखान्यांकडील १९५ कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित

लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा तीन कोटींचे नुकसान

कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही ४७८ कोटींची थकबाकी

खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, ३७ कोटींचे नुकसान

८ थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत ६.१२ कोटींचा तोटा

विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आता पुढे काय काय होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.