राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी सत्तास्थापनेचा तिढा अध्यापही सुटलेला नाही. सर्वच महत्त्वाचे पक्ष सत्ता स्थापनेत अयशस्वी ठरल्यानं मंगळवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यातच शिवसेनेनं जनादेशाचा अनादर केल्यामुळंच ही परिस्थिती उद्भवल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडमोडींनी वेग घेतला आहे. दरम्यान, आता सत्तास्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवनेने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याला नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर सरकार मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, आज झालेल्या बैठकीत आमच्या सर्व आमदारांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचे म्हटले आहे. मला वाटतं की नवीन वर्ष सुरू होण्या अगोदरच महाराष्ट्राला सरकार मिळेल.

तसेच, मित्रपक्षांमध्ये आता एकवाक्यता ठेवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. आमदारांच्या बैठकीत काँग्रेस सोबत समान कार्यक्रम ठरवण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यात मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी सत्तास्थापनेसाठी बहुमताच्या आकड्याची जुळवाजुवळ करण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बोलणी सुरू असून, आपण भाजपाची सत्तास्थापन करण्यासाठी वाटेल ते करू. अनेक आमदार संपर्कात आहेत, असं भाजपाचे नेते नारायण राणे म्हटलेलं आहे.