मागचे तीन दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी कसोटीचा काळ होता. अजित पवार यांच्या बंडामुळे पक्ष फुटतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. आता सर्व काही सुरळीत झाले असले तरी, कसोटीच्या या काळात खासदार सुप्रिया सुळे यांचे पक्षातील महत्व अधोरेखित झाले आहे. अजित पवार यांनी पक्षविरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे समजले त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्या डोळयात अश्रू तरळले.

पण त्यानंतर सुप्रिया सुळेंनी स्वत:ला सावरलं व वडिलांसोबत मिळून पक्षाला एकजूट ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली. शनिवारी सुरु झालेला हा सत्ता संघर्ष मंगळवारी संपुष्टात आला. तीन दिवस सुप्रिया सुळे वडिलांसोबत सावलीसारख्या वावरल्या. सुप्रिया सुळे दिल्लीच्या राजकारणात सक्रीय असतात. पण मागचे तीन दिवस राष्ट्रवादीच्या प्रत्येक बैठकीला त्या उपस्थित होत्या. पक्षाची रणनिती ठरवण्यापासून ते अन्य पक्षीय नेत्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी त्यांनी निभावली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांना ज्या हॉटेलवर ठेवले होते तिथे सतत त्यांच्या फेऱ्या सुरु होत्या. “आमदारांची फाटाफुट रोखण्याच्या या ऑपरेशनमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. सर्व परिस्थितीवर त्या बारीक लक्ष ठेऊन होत्या. गरज पडेल तिथे त्या आपला सल्ला द्यायच्या” असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले.

आणखी वाचा- गळाभेट भाऊ बहिणीची… विधानसभेत सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचे खास स्वागत

“आमदारांची दोन गटांमध्ये विभागणी केली तर व्यवस्थापन करणे सोपे जाईल हा त्यांचाच सल्ला होता” असे राष्ट्रवादीमधील सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीने १२ आमदारांना सोफीटेल तर ३४ आमदारांना ग्रँड हयात हॉटेलमध्ये ठेवले होते. सुप्रिया सुळे २००६ पासून राजकारणात सक्रीय झाल्या. सर्वप्रथम राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. २००९ पासून बारामतील लोकसभा मतदारसंघातून सातत्याने त्या निवडून आल्या आहेत.

शरद पवारांचे राजकीय वारस कोण? अजित पवार की, सुप्रिया सुळे? हा प्रश्न अनेकांना पडतो. सुप्रिया सुळे दिल्लीत तर अजित पवार महाराष्ट्रात असे संकेत राष्ट्रवादीने आतापर्यंत दिले आहेत. आता अजित पवारांनी केलेल्या बंडखोरीमुळे सुप्रिया सुळेंचे पक्षातील स्थान अधिक बळकट झाले आहे.