राज्यामध्ये विधानसभेचा निकाल लागून तीन आठवडे झाल्यानंतरही सत्तेस्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यातच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकी मुंबईमधील रिट्रीट आणि ट्रायडण्टसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु आहेत. किमान समान कार्यक्रमावर एकमत होण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. असं असलं तरी नेटकऱ्यांना आता या सत्तास्थापनेच्या राजकीय तिढ्याचा कंटाळा आल्याचे चित्र दिसत आहे. या सत्ता स्थापनेच्या तिढ्यावरुन सोशल नेटवर्किंगवर अनेक विनोद व्हायरल झाले आहे. मात्र मागील दीड आठवड्यापासून सोशल मिडियावर सर्व नेत्यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला तर त्यामधील संवाद कसे रंगतील यासंदर्भातील व्हॉट्सअ‍ॅपचे कल्पनात्मक पण मजेदार स्क्रीनशॉर्ट तयार केले आहेत.

राजकारण्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप केला तर काय होईल या थीमवर आधारित ट्विटरला दीड आठवड्यामध्ये दीड हजारांहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. महाराष्ट्रातील सत्तेता तिढा सोडवण्यासाठी सर्व प्रमुख नेत्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला तर त्या ग्रुपमध्ये काय चर्चा होईल अशी कल्पना करून हे स्क्रीनशॉर्ट तयार करण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्र पॉलिटिक्स’ नावाने दाखवण्यात आलेल्या या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये राज्यातील सर्व प्रमुख नेते असल्याचे दाखवण्यात आले आहे. पहिल्या स्क्रीनशॉर्टमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असे बरेच नेत्यांमधील संवाद दाखवण्यात आला आहे. गाण्यांच्या माध्यमातून हे नेते एकमेकांवर टीका करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुढील स्क्रीनशॉर्टमध्ये फडणवीस या ग्रुपमध्ये अमित शाह यांना अॅड करतात आणि मग काय होते याबद्दलचे भाष्य करण्यात आलं आहे.

दरम्यान हे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले असले तरी हे केवळ उपहासात्मक आणि कल्पनात्मक असल्याचे निर्मात्याने म्हटले आहे. यामधून कोणत्याही पक्षाच्या समर्थकांच्या किंवा नेत्याच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचेच या निर्मात्याला सूचित करायचे आहे.