तिन्ही अपक्ष आमदार भाजपबरोबर

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

‘काँग्रेसमुक्त कोल्हापूर’ अशी घोषणा करणाऱ्या भाजपवर कोल्हापूर जिल्ह्य़ात भाजपमुक्त होण्याची वेळ आली. एकाही जागेवर खाते न उघडता आलेल्या भाजपाने कोल्हापुरात बेरजेचे राजकारण सुरू केले असून तिन्ही अपक्ष आमदारांना आपल्या गळाला लावले.

भाजपाचा ‘ब’ गट अशी टीका झालेल्या जनसुराज्य शक्तीपक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसचे माजी मंत्री परंतु अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रकाश आवाडे यांनीही असाच निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळमध्ये बंडखोरी करून यश मिळविले असून त्यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यांची पाठिंबा देण्याची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी त्यांची विकासकामांची भूमिका पाहता ते भाजपाच्या जवळ राहतील अशी चर्चा आहे. यामुळे युद्धात हरलेल्या भाजपाने तहात यश मिळविण्याच्या दृष्टीने कोल्हापुरात पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.

लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्यानंतर कोल्हापुरातील सर्व दहा जागा जिंकू, असा आत्मविश्वास महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीवेळी व्यक्त करीत होते. मतदानादिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्यात २५० आणि जिल्ह्य़ातील सर्व दहा जागा जिंकू, अशी खात्री व्यक्त केली होती. भाजपाचे कोल्हापूरमधील दोन्ही आमदार मोठय़ा मताधिक्क्य़ाने पराभूत झाले. सहा आमदार असलेल्या शिवसेनेला केवळ भुदरगडवर भगवा फडकविता आला. जिल्ह्य़ात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. याचवेळी तीन अपक्षांनी बाजी मारल्याने त्यांचे महत्त्व वाढले. शिवसेनेने त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपानेही या दिशेने प्रयत्न केले. यामध्ये हे तिन्ही आमदार भाजपाच्या बाजूने जात असल्याचे दिसत आहे.

महायुतीचा घटक पक्ष म्हणून जनसुराज्य शक्ती पक्षाची ओळख होती. मात्र विधानसभेपूर्वी भाजपा व जनसुराज्यने आमचा संबंध उरला नाही असे स्पष्ट केले. मूळच्या भाजपाच्या चौघांनी जनसुराज्यमधून उमेदवारी घेतल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला. शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांना २५ हजारांच्या मताधिक्याने पराभूत केलेले विनय कोरे पुन्हा एकदा भाजपाच्या संपर्कात आले आहेत. जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपाचा घटक पक्ष राहील असे सांगून माजी मंत्री कोरे यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. निवडणुकीपूर्वी महायुती झाली नसती तर प्रकाश आवाडे शिवसेनेचे उमेदवार झाले असते अशी चर्चा होती. पण ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले. त्यांनी भाजपाचे सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांचा ५० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. निकालानंतर लगेचच शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आवाडे व यड्रावकर यांची भेट घेतल्याने ते दोघे

सेनेला पाठिंबा देतील, अशी चर्चा होती. मात्र गुरुवारी आवाडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले आहे. निकालानंतर यड्रावकर यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यांची भूमिका ही आज शनिवारी जयसिंगूपर येथे होणाऱ्या मेळाव्यात ते स्पष्ट करतील. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपासोबत जाण्याची शक्यता अधिक आहे.

पाठिंबा देण्याची कारणे..

* कोरे यांच्या वारणा साखर कारखाना, दूध प्रकल्प या अडचणीतील संस्थांना केंद्र-राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

* या संस्थांचे गाडे आता थोडेसे रुळावर आले असून, त्याला गती मिळण्यासाठी ते भाजपासोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे.

* इचलकरंजी येथे केंद्र शासनाच्या माध्यमातून ‘इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आवाडे राबवत आहेत.

* त्याला चालना मिळण्यासाठी व वस्त्रोद्योगातील प्रश्न सुटण्यासाठी शासनाची मदत असल्याने त्यांनी भाजपाशी जवळीक साधल्याचे स्पष्ट होत आहे.

* राजेंद्र पाटील यांची बांधिलकी राष्ट्रवादीशी असली तरी त्यांना शिरोळ तालुक्यात भारती-डी.वाय. पाटील या संस्थांप्रमाणे मोठे, अल्पदरात पण अद्ययावत पद्धतीने उपचार करणारे भव्य रुग्णालय सहकार तत्त्वावर उभे करावयाचे आहे.

* त्यासाठी त्यांनी नोंदणीपत्रही मिळविले असून हा प्रकल्प साकारण्यासाठी त्यांना शासनाची मदत लागणार असल्याने भाजपा विरोधात भूमिका घेतील असे वाटत नाही.

* या घटना घडामोडी व तिन्ही अपक्ष आमदारांची भूमिका पाहता ते भाजपासोबत राहतील. दारुण अपयश आलेल्या कोल्हापुरातील भाजपाला तिन्ही अपक्षांचा पाठिंबा हाच मोठा आधार ठरणार आहे.