19 September 2020

News Flash

मित्रपक्षांचा भाजपविरोधात संताप

भाजप-शिवसेना महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या रासपसाठी भाजपने तीन जागा सोडण्याचे मान्य केले होते.

(संग्रहित छायाचित्र)

उमेदवारांना भाजपचे चिन्ह दिल्याने नाराजी; रासपची आज विशेष बठक

महायुतीमध्ये भाजपने सोडलेल्या दौंड व जिंतूर या दोन जागा राष्ट्रीय समाज पक्षाने आपल्या चिन्हावर लढण्याचे ठरवले असताना उमेदवारी अर्ज दाखल करताना ऐन वेळी या दोन्ही ठिकाणी कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठीचा अर्ज (बी फॉर्म) भाजपने जोडल्याने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर नाराज झाले आहेत. या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी रासपच्या प्रदेश कार्यकारिणीची बठक सोमवारी मुंबईत होणार आहे.

भाजप-शिवसेना महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या रासपसाठी भाजपने तीन जागा सोडण्याचे मान्य केले होते. त्यात रासपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांची दौंडची जागा आणि परभणीमधील जिंतूर व गंगाखेड अशा एकूण तीन जागा होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपने गंगाखेडच्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला फॉर्म भरण्याची संधी दिली. हे लक्षात येताच रासपने पक्षाचे २०१४ मधील उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना अर्ज भरण्यास सांगितले, तर तिकडे दौंड राहुल कुल यांना, तर जिंतूरमध्ये मेघना साकोरे-बोर्डीकर या उमेदवारांना पटवून भाजपने कमळ चिन्हावर लढण्यासाठीचा बी फॉर्म जोडून या दोघांचे अर्ज भरले. हे सर्व उमेदवारी अर्ज भरले जात होते त्या वेळी रासपचे प्रमुख महादेव जानकर हे परळीमध्ये पंकजा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. सर्व फॉर्म भरल्यावर सायंकाळी जानकर यांना ही गोष्ट समजली. भाजपच्या या खेळीमुळे जानकर संतापले असून त्यांनी पुढील निर्णय घेण्यासाठी सोमवारी मुंबईत बठक बोलावली आहे.

आम्ही रासपच्या वतीने दौंड, जिंतूर व गंगाखेड अशा तीन ठिकाणी पक्षाच्या उमेदवारीचे फॉर्म पाठवले होते. सर्वसाधारणपणे कपबशी हे चिन्ह आम्हाला मिळते. गंगाखेडची जागा भाजपने ऐन वेळी शिवसेनेला सोडल्याने आम्ही गुट्टे यांना अर्ज दाखल करण्यास सांगितले, तर दौंड व जिंतूरमध्ये रासपचा फॉर्म असताना भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना कमळावर निवडणूक लढण्यासाठीचा भाजपचा बी फॉर्म जोडला.

हे आम्हाला नंतर समजले. भाजपने आम्हाला बनवले असून या प्रकारामुळे रासपबद्दल व नेते महादेव जानकर यांच्याबद्दल समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे या प्रकारानंतर पुढील निर्णय घेण्यासाठी पक्षाध्यक्ष जानकर यांनी सोमवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बठक मुंबईत बोलावली आहे, असे रासपचे सरचिटणीस व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.

आठवले यांचीही नाराजी : रासपच्या दोन उमेदवारांच्या अर्जाला आयत्या वेळी भाजपचा बी फॉर्म जोडल्याने आता भाजप व मित्रपक्षांचे असे सर्व १६४ उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असल्याचे चित्र आहे. रामदास आठवले यांनी सर्व उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर उतरवले. तरीही त्यांना कबूल केलेली मानखुर्द शिवाजीनगरची जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडली आणि आठवले यांनी जाहीर केलेले उमेदवार गौतम सोनवणे यांना भाजपने एबी फॉर्म दिलाच नाही. त्यामुळे सोनवणे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे आठवले यांनीही नाराजी बोलून दाखवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 12:54 am

Web Title: allies are angry with the bjp abn 97
Next Stories
1 काँग्रेसच्या प्रचाराचा भर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारीवर
2 ‘आरोग्यवर्धिनी’बाबत आरोग्य अधिकारीच अनभिज्ञ 
3 पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरियमसिंग पोलीस कोठडीत
Just Now!
X