X
X

#MaharashtraPoliticalCrisis: “राज हे किती भक्कम नेता आहेत हे आज पुन्हा एकदा जाणवलं”

READ IN APP

"सस्पेन्स सिनेमालाही मागे टाकेल अशा घडामोडी राज्यात घडतायत"

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १९ दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यपालांनी भाजपाला सत्तेस्थापनेसाठी शनिवारी आमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यानंतर शिवसेनेलाही सत्ता स्थापनेचा दावा करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पाठिंबा पत्रे वेळेत न मिळाल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थपनेचे आमंत्रण दिले आहे. राज्यातील याच घडामोडींवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून आज राज ठाकरे हे नेता म्हणून किती भक्कम आहेत हे जाणवतं,” असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रे न मिळाल्याने राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे आमंत्रण राज्यपालांनी दिले. त्यानंतर खोपर यांनी सोशल नेटवर्किंगवर आपल्या भावना व्यक्त केल्या. सोशल नेटवर्किंगवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, “दुपारपासून बातम्या बघतोय. सस्पेन्स सिनेमालाही मागे टाकेल अशा घडामोडी घडत होत्या. सगळ्यांचे म्हणजे अगदी मीडिया आणि विश्लेषकांचे अंदाजही चुकत होते. अजूनही पुढे काय घडणार हे ठामपणे सांगता येईल अशी परिस्थिती नाहीच. उत्कंठा सतत वाढवत नेणाऱ्या या सत्तानाट्याच्या क्लायमॅक्सकडे लक्ष लागलंय आणि थोडं वाईटही वाटतंय. माझ्या राज्यात इतकी अस्थिर राजकीय परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही. उत्तरेतल्या किंवा दक्षिणेतल्या राज्यात सत्तापिपासू पक्षांमध्ये चालणारी साठमारी अनेकदा पाहिली. त्यावेळी आपल्या राज्यातल्या राजकीय संस्कृतीचं आणि प्रगल्भ मतदारांचं कौतुक वाटायचं. पण आता ती परंपरा संपली असं वाटतंय. मतदार अजूनही प्रगल्भ आहे, पण त्यांच्या मतांना किंमत न देणारे आता आपल्या बोकांडी बसणार हे दिसायला लागलं. सगळा देश या सत्तानाट्याकडे बघून हसत असेल, हा विचार करुन या कुडमुड्यांची जरा जास्तच किळस वाटायला लागलाय. राज्यातील मतदारांनो, तुमच्या दु:खात मी सहभागी आहे.”

पोस्टच्या शेवटी खोपकर यांनी या परिस्थितीमधून राज ठाकरे भक्कम असल्याचे दिसून आले आहे असं म्हटलं आहे ‘“मनसे” सांगतो, आज राजसाहेब ठाकरे हे नेता म्हणून किती भक्कम आहेत हे पुन्हा एकदा जाणवलं. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, राजसाहेब तुमच्यासाठी काहीपण, कधीपण…,’ असं म्हणत त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट केला आहे.

दरम्यान, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरेंच्या सुचनेनुसार आपण भूमिका स्पष्ट करणार असल्याचे काही दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

21
X