राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत अप्रत्यक्ष प्रचाराचा नारळ फोडला. कलम ३७० आणि ३५ए वरून शाह यांनी शरद पवारांसह विरोधकांवर हल्लाबोल केला. “ही शिवछत्रपतींची भूमी आहे. स्वराज्याचं निर्माण इथूनं झाली. मुघलांशी लढाई येथूनच सुरू झालं. त्यामुळे कलम ३७० आणि ३५ ए विरोधात भूमिका घेणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं जागा दाखवून द्यावी,” असे  आवाहन शाह यांनी यावेळी केले.

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. यावेळी शाह यांनी कलम ३७० वर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना अमित शाह यांनी जम्मू काश्मीर, कलम ३७०व ३५ ए, पाकव्याप्त काश्मीर यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. अमित शाह म्हणाले, “अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करणारा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला. जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचे अंग झाले आहे. पण, शरद पवार आणि राहुल गांधी कलम ३७० व ३५ ए चा विरोध करत आहे. मला शरद पवार आणि राहुल गांधी यांना सांगायच की, जम्मू काश्मीर हा भाजपासाठी राजकीय मुद्दा नाही. हा देशाच्या हिताचा निर्णय आहे. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी ते कलम ३७० व ३५ ए विरोधातील आहेत की बाजूचे हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं,” असं शाह म्हणाले.

“पुलवामासारखं काही घडल नाही तर महाराष्ट्रात बदल घडेल”असं शरद पवार औरंगाबाद येथे बोलताना म्हणाले होते. पवार यांच्या विधानाचा शाह यांनी समाचार घेतला. शाह म्हणाले,”हे नाही झाल. ते नाही झाल तर आम्ही जिंकू असं काँग्रेस-राष्ट्रवादीवाले म्हणत आहे. पण काहीही झाल नाही तरी महाराष्ट्रात भाजपाच पूर्ण बहुमताचं सरकार येणार आहे,” असा दावा शाह यांनी केली.

महाराष्ट्रात दोन भूमिका असलेले पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहे. एकीकडे भारताला सर्वस्व मानणारी भाजपा आणि मित्रपक्ष. दुसरीकडे आपल्या कुटुंबालाच आपले सर्वस्व माननारे राष्ट्रवादी-काँग्रेसवाले. राष्ट्रवादी भूमिका असलेल्या पक्षासोबत जायचं की घराणेशाही असलेल्या पक्षासोबत जायचे, हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवाव,” असं शाह म्हणाले.