विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पुन्हा बहुमताने सत्तेत येण्याचा दावा केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर असून, विधानसभा निकालानंतरही फडणवीसच मुख्यमंत्री होणार,” असं शाह म्हणाले.

मुंबईतील गोरेगाव येथे कलम ३७० याविषयावर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची सभा झाली. यावेळी शाह यांनी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा केला. युतीच्या विषयावर भाष्य न करता शाह म्हणाले, “हे झाले. ते झाले नाही तर आम्ही जिंकू असं राष्ट्रवादीवाले म्हणत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. गुंतवणूक, शेती, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे आणले आहे. राज्यात भाजपा पुन्हा तीन चतुर्थांश बहुमतानं सत्ता स्थापन करेल आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील,” असं शाह यांनी सांगितलं.

यावेळी शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कलम ३७० वरून टीका केली. महाराष्ट्रात दोन भूमिका असलेले पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहे. एकीकडे भारताला सर्वस्व मानणारी भाजपा आणि मित्रपक्ष. दुसरीकडे आपल्या कुटुंबालाच आपले सर्वस्व माननारे राष्ट्रवादी-काँग्रेसवाले. राष्ट्रवादी भूमिका असलेल्या पक्षासोबत जायचं की घराणेशाही असलेल्या पक्षासोबत जायचे, हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवाव,” असं शाह म्हणाले.