20 January 2020

News Flash

देशातील घुसखोरांना २०२४च्या आधी हुसकावून लावणार – अमित शहा

परकीय घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण, शरद पवार, राहुल गांधी यासारख्या नेत्यांना त्यांचा पुळका आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

परकीय घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण, शरद पवार, राहुल गांधी यासारख्या नेत्यांना त्यांचा पुळका आला आहे. आता त्यांना कितीही ओरडू द्या, या घुसखोरांना २०२४च्या आधी हुसकावून लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी धारणी येथील प्रचार सभेत बोलताना केली.

भाजपच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे उमेदवार डॉ. अनिल बोंडे, रमेश बुंदिले, रमेश मावस्कर, प्रताप अडसड यांच्यासह माजी मंत्री हंसराज अहीर, प्रवीण पोटे, चंद्रशेखर बावनकुळे, खंडवा येथील खासदार नंदकिशोर चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेचे काश्मीरमधील ३७०व्या कलमाशी काय घेणे-देणे आहे, असा प्रश्न शरद पवार विचारतात. पण ते हे विसरतात की काश्मीरसाठी मेळघाटच नव्हे, तर संपूर्ण देशातील जनता प्राणाची आहुती देण्यास तयार आहे. आमच्यासाठी निवडणूक महत्त्वाची नाही, तर देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. पूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानकडून हल्ले केले जात होते, पण ‘मौनीबाबा’चे तोंड उघडत नव्हते. आमच्या सैनिकांचे गळे कापून नेले जात होते, पण त्याला प्रत्युत्तर दिले जात नव्हते. देशाला पहिल्यांदा ५६ इंच छातीचा पंतप्रधान लाभला आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पाकिस्तानला त्यांच्या घरात शिरून धडा शिकवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेशांमध्ये जयजयकार होतो, तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात दुखू लागते. हे नारे नरेंद्र मोदींसाठी नव्हे, कमळ चिन्हासाठी नव्हे, तर देशातील १२५ कोटी जनतेच्या सन्मानार्थ लावले जातात, हे लक्षात घ्यायला हवे. देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे अमित शहा म्हणाले.

काँग्रेसने जे ५० वर्षांत केले नाही ते नरेंद्र मोदींनी फक्त पाच वर्षांत केले. दोघांच्या कारकिर्दीची तुलना करा. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस उत्तमरीत्या सरकार चालवत आहेत, म्हणून त्यांना पुन्हा निवडून द्या, असे आवाहन अमित शहा यांनी केले.

अमित शहा यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीचा आलेख मांडला. अमरावती जिल्ह्यात १.८१ लाख शौचालयांची उभारणी होऊन गावेच्या गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. दोन लाख ११ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीची रक्कम जमा झाली आहे. अमरावतीच्या विमानतळाचे विस्तारीकरण होत आहे. अमरावतीला स्मार्ट सिटीचा दर्जा देण्यात आला आहे. हजारो कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर, विजेचे कनेक्शन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा विषय असो, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारांनी सर्वागीण विकास साधला आहे, असे शहा म्हणाले.

First Published on October 12, 2019 4:23 am

Web Title: amit shah sharad pawar akp 94
Next Stories
1 जिल्ह्यत केवळ एकच महिला उमेदवार
2 २९१ झाडांची कत्तल
3 पालघरच्या नगराध्यक्ष प्रचारापासून दूर
Just Now!
X