महायुतीची तयारी सुरू; अमित शहांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

मुंबई : भाजप-शिवसेना महायुतीला १६२ जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर युतीच्या सत्तावाटपाची चर्चा दिवाळीनंतरच होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर बातचीत केल्याने महायुती सरकारच्या दुसऱ्या पर्वाची स्थापना आणि सत्तावाटप पुढील आठवडय़ात होणार हे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ , शिवसेनेला ५६ तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला एक अशा एकूण १६२ जागा मिळाल्या आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी संख्याबळ घटल्याने भाजपला बहुमतासाठी शिवसेनेची अधिक गरज पडणार आहे. त्यामुळेच ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा हवा, असा सूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘ठरल्यानुसारच होईल’ असे जाहीर करत भाजप शिवसेनेला दुखावणार नसल्याचे संकेत दिले. नव्याने सत्तावाटपासाठी भाजप सकारात्मक असल्याचे संकेतच फडणवीस व शहा यांनी दिले आहेत. दिवाळी झाली की सरकार स्थापनेचे पाहू, असे फडणवीस यांनीही म्हटले होते. त्यामुळे दिवाळी गोडीगुलाबीत साजरी झाल्यानंतर सत्तावाटपाची अप्रिय रस्सीखेच सुरू होईल, असे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे नेते शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंब्याचे संकेत देत असल्याबाबत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले की, काँग्रेसला पुन्हा विरोधी पक्षात बसावे लागणार असल्याने ते संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. खुद्द उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे सरकार येईल, असे निकालानंतर सांगितल्याकडेही भांडारी यांनी लक्ष वेधले. तर जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी दिलदारपणा दाखवला होता. आता भाजपकडून शिवसेनेचा सन्मान ठेवणारा प्रस्ताव येईल अशी अपेक्षा असल्याचे शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोहीम

आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात शिवसेनेचे व महाराष्ट्राचे नेतृत्व करावे यासाठी चर्चा सुरू करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या फलकांमध्ये महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. तर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी ‘महाराष्ट्र तुमची वाट पाहत आहे’, असे ट्वीट करत आदित्य यांनी नेतृत्व करावे असे सूचक आवाहन केले आहे. अर्थात खुद्द उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी आता आदित्य आमदार होणार आहे, हळूहळू त्याची वाटचाल होईल, असे संकेत दिले होते. त्यामुळे  आदित्य यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतची चर्चा ही दबावाच्या राजकारणाचा भाग असल्याचे मानले जाते.

घडले काय?

संख्याबळातील तिढय़ाचा उपयोग करत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आघाडीच्या मदतीने शिवसेनेने ठरवल्यास त्यांना मुख्यमंत्रिपद मिळू शकते, असा खडा टाकला. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेने वेळोवेळी व्यक्त केलेली आकांक्षा, नवीन सत्तासमीकरणात त्यांचे वाढलेले महत्त्व या पाश्र्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून सत्तावाटपाबाबत चर्चा करण्याबाबत बोलणी केली.