राज्याती सत्तेचा तिढा सुटतासुटत नसल्याचे पाहता, भाजपाचे वरिष्ठ नेते यामध्ये मध्यस्थी करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रामुख्याने भाजपा अध्यक्ष अमित शाह हे हा पेच सोडवण्यासाठी महाराष्ट्रात येतील, असे वाटतं होते. मात्र, अमित शाह या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणार नाहीत, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. भाजपा-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीच हा पेच सोडवावा असे त्यांनी म्हटले असल्याचेही आठवले म्हणाले आहेत.

आठवले यांनी सांगितले आहे की, दोन दिवस दिल्लीत असताना भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी देखील सत्तास्थापनेच्या तिढ्यावरून मी चर्चा केली. अमित शाह यांचे म्हणने आहे की, मी तिकडे येऊन काही फायदा नाही. भाजपा आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत मार्ग काढायला हवा. भाजपाची भूमिका मुख्यमंत्रीपद देण्याची नाही, मात्र अन्य काही देण्याबाबत स्थानिक नेतेमंडळीच चर्चा करून मार्ग काढू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी संपूर्ण अधिकार दिले आहेत. यामुळे सध्या दोन्ही बाजूने बैठका सुरू आहेत व कदाचित दोन्ही पक्षांकडून बैठकीत सकारात्मक चर्चा होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा तिढा सोडवण्याचा देखील प्रयत्न केला आहे. चर्चा होती की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद भाजपा देणार नाही. तर, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार तयार करू शकते. मात्र, शरद पवार यांनी स्पष्ट केले की माझा पक्ष विरोधी पक्षात बसेल. जनादेश भाजपा-शिवसेनेला मिळालेला आहे. त्यांनी सरकार बनवायला हवं. एक योग्य संदेश शरद पवार यांच्या वक्तव्याद्वारे मिळालेला आहे. त्यामुळे मला वाटतं की बराच दिवसांपासूनचा हा तिढा सुटण्याची शक्यता आहे. कालपासून भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे, त्यात सकारात्मक चर्चा सुरू आहे. यात शिवसेनेला बरोबर घेऊनच भाजपा सरकार स्थापन करेल असं ठरताना दिसत आहे. तसेच, शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत देखील अशाच प्रकारची सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता असल्याचेही आठवले म्हणाले होते.