अपवाद वगळता राज्यभरात निरुत्साही वातावरण

मुंबई : विधानसभा निवडणूक म्हटली की राजकीय पक्षांची प्रचारफेरी, कार्यकर्त्यांची लगबग-धावपळ, झेंडे-फलक आणि प्रतिस्पध्र्यावर हल्ला चढवणारी घोषणाबाजी हे नेहमीचे चित्र. मात्र आर्थिक मंदीपासून कृषीसंकट, बेरोजगारी असे स्फोटक विषय असूनही यंदा विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आला तरी काही अपवाद वगळता राज्यात बहुतांश मतदारसंघांत एकंदर निवडणुकीच्या वातावरणाचा अभाव आणि मतदार आणि कार्यकर्त्यांतही एकप्रकारचा निरुत्साह असल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबरला निघाली असली तरी भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांनी ४ ऑक्टोबर या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीची घोषणा सुरूच ठेवली. त्यामुळे यंदा प्रचारासाठी अवघे १४ दिवसच उमेदवारांना मिळाले. त्यातही युती झाल्याने बंडखोरीची लाटच आली. त्यामुळे अनेक मतदारसंघांतील उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ७ ऑक्टोबपर्यंत नाराजांना राजी करण्यातच अडकून पडले. खऱ्या अर्थाने ८ ऑक्टोबरपासून राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला व १९ सप्टेंबरला तो संपत आहे. अवघे ११ दिवस प्रचारासाठी उपलब्ध झाले.

अत्यंत चुरशीची लढत, बडय़ा नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे असे अपवादात्मक मतदारसंघ सोडले तर बहुतांश मतदारसंघात निरुत्साहाचे चित्र आहे. निवडणूक आहे की नाही, असाच प्रश्न पडत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेले १० दिवस रोज चार ते पाच सभा घेत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही दिवसाला चार ते पाच सभा घेत आहेत. या नेत्यांच्या सभांमधूनच काय ते निवडणुकीच्या राजकारणाचे रंगीबेरंगी रूप समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत आठ सभा घेतल्या असून शेवटची नववी सभा शुक्रवारी झाली. अमित शहा यांनी दिवसाला चार ते पाच मतदारसंघ पिंजून काढले. त्या तुलनेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खूप कमी वेळ दिला.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा उघडऐवजी छुप्या पद्धतीने जास्त केला जात असून समाजमाध्यमांचा वापर त्यासाठी जास्त करण्यात येत असल्याचेही दिसून आले. मागच्या वेळी केवळ भाजप समाजमाध्यमांवर प्रभावी होती. आता सर्वच राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी समाजमाध्यमांवरील प्रचाराला महत्त्व दिल्याने सारा प्रचार व रंग मोबाइलवर एकवटले आहेत. आपण कुठे व कसा प्रचार करत आहोत हे समोरच्या उमेदवाराला समजू नये व त्याने लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याची संधी मिळू नये यासाठी छुपा प्रचार जास्त केला जात आहे. मतदारसंघातील मतदारांचे संपर्क क्रमांक व इतर तपशील घेऊन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी मोबाइलवरील- समाजमाध्यमांवरील प्रचारासाठी काम करत असल्याचे सांगण्यात आले.

तंत्रज्ञानाचा वापर यंदा प्रचारात खूप असून भावना मात्र हरवली आहे. उमेदवार व पक्षाविषयी भावनिक आपुलकी-जवळीक असणारे विविध पक्षांचे कार्यकर्ते हेच प्रचार रंगतदार करण्यात प्रमुख भूमिका वठवत असत. आता तंत्रज्ञानामुळे थेट संबंधित मतदारापर्यंत उमेदवाराचा-पक्षाचा संदेश पोहोचवणारी यंत्रणा उपलब्ध झाल्याने निवडणुकीच्या वातावरणावर त्याचा परिणाम झाला आहे, असे भाजपचे प्रवक्ते अतुल शहा यांनी सांगितले.

नेमके झाले काय?

देशात सध्या आर्थिक मंदीचे वातावरण आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी, बेरोजगारी अशा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय खूप आहेत. मात्र भाजप-शिवसेना युतीने विरोधकांमधील अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचले. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेला जाब विचारण्यासाठी प्रबळ विरोधक नाही आणि कोणीही कुठेही जात असल्याने मतदारांमध्ये नेत्यांबद्दल- राजकीय भूमिकांबद्दल विश्वास उरलेला नाही. त्याचाही परिणाम निवडणुकीच्या वातावरणावर झाला आहे. नेत्यांच्या प्रचारसभा आणि त्यात दिले जाणारे आव्हान-प्रतिआव्हान, मिश्कील टोले व त्याचे माध्यमांमधून होणारे प्रसारण यापुरताच निवडणुकीचा रंग उरला आहे.

हे चित्र हरविले..

प्रचारासाठी खूप कमी कालावधी असल्याने उमेदवार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रचारफेऱ्या काढतील, त्यातून मोठी वातावरणनिर्मिती होईल आणि राजकारण निवडणुकीचे नानारंग राज्यभर दिसतील अशी अपेक्षा होती. एका उमेदवाराने प्रचारफेरी काढली की लगेच प्रतिस्पर्धी उमेदवारही कार्यकर्त्यांची जास्त गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करीत.

त्यातून ईर्षेने गल्लीबोळात जोरदार प्रचार व्हायचा. यंदा हे चित्र दिसत नाही. मर्यादित प्रचारफेऱ्या, घोषणायुद्धाला फाटा असा अनुभव येत असून त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात फारसा रंगच भरलेला नाही.