नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई

वाई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सातारा येथील सभेचे स्थळ असलेल्या ‘सैनिक स्कूल’च्या मैदानाची सुरक्षा भिंत या सभेसाठी सहा ठिकाणी तोडण्यात आली आहे. मात्र या मैदानात प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग असल्याने सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही भिंत तोडत तात्पुरत्या स्वरुपाचे मार्ग तयार करण्यात आले असून सभा झाल्यावर ही भिंत पूर्ववत बांधून दिली जाणार असल्याचे सातारा जिल्हा प्रशासन आणि सैनिक स्कूलच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्ह्य़ातील  विधानसभेच्या आठ उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांच्या सभेचे येथे आयोजन केले आहे. मोदी यांच्या सभेला मोठी गर्दी जमण्याचा अंदाज घेत सभेसाठी ‘सैनिक स्कूल’चे मैदान निवडण्यात आले आहे. दरम्यान या मैदानावर उद्याच्या या सभेची तयारी सुरू असतानाच सभास्थळाच्या सुरक्षेचा आढावा घेताना या मैदानास ये-जा करण्यासाठी केवळ एकच मार्ग असल्याचे लक्षात आले. सभेसाठी काही लाख लोक जमण्याची शक्यता असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यास या मैदानास आणखी काही मार्ग असणे आवश्यक असल्याचे सुरक्षा यंत्रणेकडून सांगण्यात आल्याचे समजते. यानुसार या मैदानाला असलेली सुरक्षा भिंत फोडत तात्पुरत्या स्वरुपाचे काही मार्ग तयार करण्यात आल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले आहे. याबाबत जिल्हा प्रशासन आणि सैनिक स्कूलच्या प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनीही नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर पाडलेली भिंत पुन्हा बांधून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान या सभेसाठी मोठा मंडप उभारला असून सभास्थळापर्यंतचा रस्ताही तयार करण्यात आला आहे. या सभेसाठी सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतूनही मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. शहरातील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी भिंत तोडली

सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी या मैदानाची भिंत तोडत तात्पुरत्या स्वरुपाचे सहा मार्ग तयार करण्यात आले आहेत. हा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार घेतलेला आहे. सभा संपल्यावर ही भिंत पूर्ववत बांधून देण्यात येणार आहे.

– विक्रम पावस्कर, जिल्हाध्यक्ष, भाजप, सातारा