“वसंतराव नाईकांनंतर पाच वर्ष पूर्ण करणारा मुख्यमंत्री असा इतिहास फडणवीसांनी रचला…त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा इतिहासही त्यांनी केला…त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नशिबी काय लिहिलंय हे सटवीलाच माहित”, अशा भावना भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी काल (दि.१) विधानसभेत व्यक्त केल्या.

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनाच्या ठरावावर शेलार बोलत होते. यावेळी बोलताना शेलार यांनी, “कोकणी भाषेत एखाद्याच्या नशिबी काय लिहिलंय हे सटवीला माहिती असं म्हणतात, त्याप्रमाणे फडणवीस यांच्या नशिबी काय लिहिलंय हे सटवीलाच माहित”, असं म्हटलं. तसंच,”प्रत्येक माणसाच्या नशिबात काय लिहिलंय हे नियतीने ठरवलेलं असतं, पण देवेंद्र फडणवीस आणि नवीन इतिहास निर्माण करणं हे समीकरण दिवसेंदिवस सुस्पष्ट होतंय हे मात्र नक्की” असं शेलार म्हणाले.

पुढे बोलताना, सदनात कायद्याचा सिद्धांत मांडणारा सभासद म्हणून फडणवीस यांची ओळख आहे. संघ स्वयंसेवक म्हणून मिळेल ते काम करण्याची त्यांची भावना आहे. मनात दुःख नाही, क्लेष नाही, वेदना नाही..एक स्वयंसेवक पुन्हा विरोधी पक्षनेता होतोय याचा आम्हाला आनंद आहे रात्रीही पहारा देणारा हा नेता आहे, चुकीचं काही घडल्यावर जागता पहारा देणारा हा नेता आहे. सरकारला एकही चुकीचा निर्णय घेऊ देणार नाही असा विश्वासही शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

पाहा व्हिडिओ –