विधानसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळालेल्या सांस्कृतिक मंत्री आणि भाजपाचे नेते विनोद तावडे यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या राजकीय सल्ल्याची आठवण करून दिली आहे. “मला निवडणूक लढवू नये. असा अनाहूत सल्ला देणाऱ्या विनोद तावडेंना भाजपाचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे,”असं उत्तर देत तावडे यांच्या मर्मावर बोट ठेवलं आहे.

नांदेडमध्ये एका कार्यक्रमात विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना राजकीय सल्ला देत टीका केली होती. “लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” असा सल्ला देत “राज्यातील कुठल्याही मतदारसंघात चव्हाण उभे राहिले तरी हरतील, अशी टीका तावडे यांनी केली.

विनोद तावडे यांच्या टीकेला अशोक चव्हाण यांनीही लागलीच उत्तर दिले होते. “मी निवडणूक लढवावी की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवतो. पण माझ्याविरोधात त्यांना निष्ठावंत मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो. याची तावडेंनी अधिक काळजी केली पाहिजे,” असं ते म्हणाले होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपाने उमेदवारांच्या नावांची चार टप्प्यात घोषणा केली. यात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी तावडे यांच्या निशाणा साधला आहे. “मला निवडणूक लढवू नये. असा अनाहूत सल्ला देणाऱ्या विनोद तावडेंना भाजपाचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे,” असं टोला चव्हाण यांनी तावडे यांना लगावला.