18 January 2021

News Flash

भाजपाच्या सत्ता स्थापन न करण्याच्या निर्णयानंतर अशोक चव्हाण म्हणाले..

शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेसमधील एका गटाच्या मागणीवरही केले भाष्य

अशोक चव्हाण

सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन भाजपाकडून सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी अधिच वेगवान झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जर शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करणार असेल तर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याची बदललेली परिस्थिती पाहता पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आम्हाला निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात अभूतपूर्व अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. खरं तर भाजपाने सरकार स्थापन करणं अपेक्षित होतं. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करता आता राज्यपालांना दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलावावं लागेल. परंतु, शिवसेनेला स्वबळावर सत्तास्थापन करणे अजिबात शक्य नाही. सध्या आम्ही सर्वजण जयपूरमध्ये आहोत, या ठिकाणी काँग्रेसचे सर्व पक्षश्रेष्ठी आहेत. या ठिकाणी राज्यातील बदललेल्या परिस्थितीचा विचार करून व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे.

काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, यावर बोलताना चव्हाण यांनी सांगितलं की, काही व्यक्तिगत मतं असू शकतात मात्र व्यक्तिगत भूमिका म्हणजे काही पक्षाची भूमिका नसते. शेवटी सारासार विचार करूनच पक्षाला राजकीय निर्णय घ्यावा लागत असतो. काहीही झाले तरी भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आताच्या परिस्थितीत नेमकं पुढे काय करावं लागेल, हा धोरणात्मक निर्णय आहे. तसेच, राष्ट्रवादीबरोबर आमची आघाडी आहेच, त्यामुळे काँग्रेसला कुठलाही निर्णय़ घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोअर कमिटीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याची स्पष्ट केलं. आम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करू शकत नाही, अशी माहिती राज्यपालांना दिल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2019 7:00 pm

Web Title: ashok chavan said after bjps decision not to establish power msr 87
Next Stories
1 झारखंड विधानसभा : भाजपाची ५२ जणांची तर काँग्रेसची पाच जणांची पहिली यादी जाहीर
2 शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या चर्चेबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले…
3 Video : इम्रान खान यांनी विचारलं, “आमचा सिद्धू कुठे आहे?”
Just Now!
X