राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भाजपाने तिकीट नाकारले. यावरुनच आता काँग्रसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तावडेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. ताडवेंसोबत नियतीनेच विनोद केल्याचा टोला लगावत त्यांनी काँग्रेसमध्ये यावं मी त्यांना तिकीट देतो अशी चपकार चव्हाण यांनी लगावली आहे.

विनोद तावडे यांचे नाव भाजपाच्या शेवटच्या यादीतही न आल्याने ते निवडणूक लढणार नाही हे स्पष्ट झालं. त्यानंतर तावडेंनी मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल असं स्पष्ट केलं. मात्र तावडेंना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यापासून त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये चव्हाणांचा पराभव झाल्यानंतर चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये असा सल्ला तावडेंनी दिला होता. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात तावडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यावरून चव्हाण यांना राजकीय सल्ला देत टीका केली होती. “लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” असा सल्ला देत “राज्यातील कुठल्याही मतदारसंघात चव्हाण उभे राहिले तरी हरतील, अशी टीका तावडे यांनी केली. याचवरुन आता चव्हाणांनी परतफेड करत तावडे यांना खडे बोल सुनावले आहेत. ‘तावडेंसोबत नियतीनेच विनोद केला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये यावं मी त्यांना तिकीट देईल,’ असं चव्हाण म्हणाले. सध्या भजापाचे बोरवलीमधील आमदार असणाऱ्या तावडेंऐवजी यंदा सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले आहे.

याआधीही चव्हाणांनी ट्विटरवरुन तावडेंवर निशाणा साधला होता. “मी निवडणूक लढवावी की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवतो. पण माझ्याविरोधात त्यांना निष्ठावंत मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो. याची तावडेंनी अधिक काळजी केली पाहिजे,” असं चव्हाण ट्विट करुन म्हणाले होते.

दरम्यान, मराठवाडय़ात  बंडांचे निशाण फडकविलेल्या प्रमुख उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली. माघारीचा हा वेग भोकर मतदारसंघात एवढा अधिक होता की, एका दिवसात ८४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात काँग्रेसकडून अशोक चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मराठवाडय़ातील ४६ मतदारसंघांत ६७४ उमेदवार आता रिंगणात आहेत. यात मोजक्याच ठिकाणी बंडखोरी दिसून येत आहे. औरंगाबाद पश्चिम, वसमत, नांदेड दक्षिण, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील चारही मतदारसंघांत बंडखोर आहेत.