देशाची अर्थव्यवस्था ढासळते आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. कॉपरेरट घोटाळ्यांपासून विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या विनाश आणि पुनर्वसनाच्या समस्या  जटील होत असताना निवडणुकीच्या प्रचारात हे मुद्दे नाहीत. अशा परिस्थितीत मतदारांनी केवळ मतदानाचे कर्तव्य बजाविण्यापुरता मर्यादित सहभाग ठेवून चालणार नाही. जनतेशी द्रोह करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना विकासाच्या मुद्दय़ावर जाब विचारला पाहिजे, अशी अपेक्षा नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पत्रकारांशी पाटकर यांनी संवाद साधला.  प्रचार सभांमध्ये जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाही. केवळ आरोप-प्रत्यारोपावरच निवडणूक लढविली जाते आहे. यामध्ये मतदारांचा सहभाग दिसत नाही.

सत्तेच्या जोरावर लोकशाही प्रक्रिया आणि संकेत धुडकावत जनविरोधी निर्णय लादले गेले. याबद्दल जाब विचारण्याची विरोधी पक्षांची स्थिती राहिली नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न निवडणुकीच्या पटलावर आणण्यासाठी आम्ही  पक्षांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.