19 October 2019

News Flash

मीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल

भाजपकडून नरेंद्र मेहता, तर काँग्रेस आघाडीतर्फे मुझफ्फर हुसेन यांच्याकडून प्रचाराला सुरुवात

भाजपकडून नरेंद्र मेहता, तर काँग्रेस आघाडीतर्फे मुझफ्फर हुसेन यांच्याकडून प्रचाराला सुरुवात

भाईंदर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कोणत्याही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात मात्र उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे. भाजपकडून विद्यमान आमदार नरेंद्र मेहता आणि काँग्रेस आघाडीकडून मुझफ्फर हुसेन यांनी निवडणूक प्रचाराची सुरुवात करत असल्याचे जाहीर केले आहे.

भाजप आणि शिवसेनेत होणारी युती लक्षात घेता मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात सध्या तरी भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढाई  असल्याचे चित्र आहे. काँग्रेस आघाडीचा उमेदवार ठरला असला तरी भाजपच्या उमेदवारीसाठी पक्षातून दोन जणांनी दावा केला आहे. विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचे सांगून प्रचाराला सुरुवात केली. मात्र मेहता यांच्या उमेदवारीला सुरुंग लावून भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी माजी महापौर गीता जैन नेटाचे प्रयत्न करत आहेत.   मात्र मेहता यांनी आपल्या प्रचाराचा नारळ गणेशोत्सवादरम्यान फोडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवातदेखील केली आहे. निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याआधी शहरात मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या मंडई, रस्ते आणि इतर विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटाच मेहता यांनी लावला आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करूनच निवडणूक प्रचाराला सुरुवात केली असून आपण जाहीरनाम्यात नमूद केलेल्या विकासकामांची पूर्तता केल्याच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवत असल्याचे मेहता यांनी सांगितले.

गीता जैन यांनी  पक्षाची यादी अद्याप जाहीर झालेली नसताना स्वत:ला उमेदवार म्हणून घोषित करणे हा पक्षशिस्तीचा भंग आहे, असे सांगितले आहे.  आपण आजही मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघासाठी दावेदार आहोत मात्र पक्षाची यादी घोषित होण्याची आपण वाट पाहात आहोत, अशी प्रतिक्रिया गीता जैन यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे काँग्रेस आघाडीकडून उमेदवारीला हिरवा कंदील मिळालेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनीदेखील प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. गेल्या आठवडय़ात मीरा रोड येथे आयोजित मेळाव्यात निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा करत असल्याचे हुसेन यांनी जाहीर केले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मीरा-भाईंदरमधील अस्तित्व संपुष्टात आले. त्यामुळे मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघावरील दावा सोडत असल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले होते. येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असून पहिल्या दहा उमेदवारांच्या नावात मुझफ्फर हुसेन यांच्या नावाचा समावेश आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

त्यामुळे मुझफ्फर हुसेन यांनीदेखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडय़ात शनिवारी झालेल्या मेळाव्यात शहराचा विकास, भ्रष्टाचार आणि लोकांवर होत असलेला अन्याय या मुद्दय़ांवर आपण ही निवडणूक लढवत असल्याचे मुझफ्फर हुसेन यांनी घोषित केले.

First Published on September 17, 2019 4:22 am

Web Title: assembly election campaign start in mira bhayandar zws 70