28 February 2020

News Flash

Live : परळीत बहिण-भावात लढत, दोघांचेही अर्ज दाखल

राज्यभरात उमेदवारांची लगबग

विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजल्यानंतर सगळीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी घाई सुरू आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, परळीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह सर्वच पक्षातील दिग्गजांसह अनेक उमेदवारांनी आजचा मुहूर्त निवडला. आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आहेत.

Live Blog

17:22 (IST)03 Oct 2019
सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदे यांचा अर्ज दाखल

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. काँग्रेसने त्यांना सोलापूर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रणिती शिंदे यांनी पायी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले.

17:05 (IST)03 Oct 2019
संदीप देशपांडेंनी अमित ठाकरेंच्या उपस्थितीत भरला अर्ज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांना पक्षाने माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनी घरापासून रॅली पदयात्रा काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. संदीप देशपांडे यांच्या पदयात्रेत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीत संदीप देशपांडेंनी अर्ज भरला.

16:56 (IST)03 Oct 2019
माढ्यात संजय कोकाटेंविरूद्ध बबन शिंदे

माढा विधानसभा मतदारसंघाची जागा आघाडीत राष्ट्रवादीकडे तर युतीत शिवसेनेला मिळाली आहे. राष्ट्रवादीने बबन शिंदे यांना उमेदवारी दिली असून, शिवसेनेने शिंदे यांच्या विरोधात संजय कोकाटे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार याची प्रतिक्षा मतदारांना आहे. 

16:44 (IST)03 Oct 2019
श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

राष्ट्रवादीचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघातून धनश्याम शेलार यांना उमेदवारी देण्याची शिफारस त्यांनी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काय निर्णय घेते याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

16:13 (IST)03 Oct 2019
अर्ज भरण्यापूर्वी धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर

परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व भाजपाच्या नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात लढत होणार आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडेंनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी सकाळी धनंजय मुंडे यांनी परळी येथे वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर जन्मगाव नाथरा येथे ग्रामदैवताचे दर्शन व गावातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथगड येथील समाथीस्थळी तसेच वडील स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी तहसिल कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री पंडीतराव दौंड, नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे,राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

16:01 (IST)03 Oct 2019
पंकजा मुंडे यांचा अर्ज दाखल

परळी विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांचे यशश्री निवासस्थानी त्यांच्या आई प्रज्ञाताई मुंडे यांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. यावेळी महादेव जानकर,खासदार डॉ. प्रितम मुंडे, डॉ.अमित पालवे, गौरव खाडे व कुटुंबिय उपस्थित होते. तत्पूर्वी पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दुपारी 12.05 वाजता त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यानंतर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विजयी संकल्प रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले.

15:29 (IST)03 Oct 2019
आशिष शेलार यांनी भरला अर्ज

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिमा, खासदार पूनम महाजन, शिवसेनेचे बाळा चव्हाण, आरपीआयचे विवेक पवार हे उपस्थित होते.

14:58 (IST)03 Oct 2019
पुणे : चंद्रकांत पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

महसूल मंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ते कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

14:53 (IST)03 Oct 2019
पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधून भाजपाकडून सिद्धार्थ शिरोळे यांचा अर्ज दाखल

14:52 (IST)03 Oct 2019
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंटमधून भाजपाचे उमेदवार सुनील कांबळेंचा अर्ज दाखल

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यामान आमदार दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार दिलीप कांबळे हे उपस्थित होते.

14:45 (IST)03 Oct 2019
पुणे : वडगावशेरी मतदारसंघातून विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांचा अर्ज दाखल

वडगावशेरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार गिरीश बापट, पुण्याचे उपमहापौर आणि रिपाइंचे नेते डॉ. सिद्धर्थ धेंडे उपस्थित होते.

14:41 (IST)03 Oct 2019
पुणे : महापौर मुक्ता टिळक यांनी भरला उमेदवारी अर्ज

पुण्याच्या महापौर आणि भाजपाच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांनी आज कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. 

14:02 (IST)03 Oct 2019
अरविंद शिंदे दोनदा अर्ज दाखल करणार

काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी कसबा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ''मुहूर्त म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्या मिरवणूक काढून अर्ज दाखल करणार आहे. कोणतीही निवडणूक साधी आणि सोपी नाही, त्यामुळे पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढविणार आहे," असं ते म्हणाले.

13:52 (IST)03 Oct 2019
चांदिवलीत नेते नसीम खान विरूद्ध सेनेचे दिलीप लांडे

काॅंग्रेसचे नेते नसीम खान यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यांनी कार्यकर्त्यांसह रॅली काढून मतदारसंघात शक्तीप्रदर्शन केले. नसीम खान यांच्या विरोधात शिवसेनेचे दिलीप लांडे हे उमेदवार आहे. 

13:47 (IST)03 Oct 2019
अमित देशमुख-धीरज देशमुख यांचा अर्ज दाखल

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांना काँग्रेस उमेदवारी दिली. अमित देशमुख यांना लातूर शहर मतदारसंघातून, तर धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांनीही आज आपआपल्या मतदारसंघातून अर्ज दाखल केले. यातील अमित देशमुख यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. त्यामुळे ही लढत महत्त्वाची असणार आहे.

13:39 (IST)03 Oct 2019
शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाड भरणार अर्ज

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड थोड्या वेळाने अर्ज भरणार आहेत. अर्ज भरताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आव्हाड यांच्याबरोबर असणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही अर्ज भरण्यापूर्वी जोरदार रॅली काढून मतदारसंघात शक्तीप्रदर्शन केले.

13:29 (IST)03 Oct 2019
नितेश राणे भाजपात; तिसऱ्या यादी नाव येण्याची शक्यता

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी आज अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. त्यांनी आज दुपारी भाजपा कार्यालयात जाऊन पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म भरला. निलेश राणे यांचे नाव भाजपाच्या तिसऱ्या यादी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नारायण राणेही भाजपात प्रवेश करण्यार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. त्यापूर्वीच निलेश राणेंनी कमळ हाती घेतले.

13:13 (IST)03 Oct 2019
शरद पवारांनी ईडीलाच शिंगावर घेतलं : रोहित पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना राष्ट्रवादीने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. रोहित पवार हे आज उमेदवारी अर्ज भरणार असून, त्यांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले आहे. 'भाजपाला वाटलं शरद पवार ईडीला घाबरतील पण, शरद पवारांनी ईडीलाच शिंगावर घेतलं,' पवार रॅलीत बोलताना म्हणाले. 

12:53 (IST)03 Oct 2019
पंकजा मुंडे वैद्यनाथाच्या चरणी

परळी मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बंधूभगिनीची लढत होणार आहे. दोघेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरायला जाण्याआधी वैद्यनाथाचे दर्शन घेतले.  यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही भगिनी आणि महादेव जानकर हे उपस्थित होते.

12:49 (IST)03 Oct 2019
अजित पवार यांचा बीड दौरा रद्द

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा बीड दौरा रद्द झाला आहे. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे धनंजय मुंडे यांचा अर्ज भरताना उपस्थित राहणार आहे. धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

12:46 (IST)03 Oct 2019
चंद्रकांत पाटील यांचाही अर्ज दाखल

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री यांनी कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला.  अर्ज भरण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी रॅली काढली. "राज्यभरात मागील पाच वर्षाच्या काळात भाजप आणि सेनेकडून मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत महायुतीला राज्यात चांगले वातावरण आहे. यामुळे या निवडणुकीत अब की बार २२० के पलिकडे आमच्या जागा येणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

12:41 (IST)03 Oct 2019
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत आदित्य ठाकरेंनी भरला अर्ज

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आदित्य यांचे वडील आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आई रश्मी ठाकरे हे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी ठाकरे कुटुंबीतून पहिल्यांदाच कुणीतरी निवडणूक लढवणार असल्याने शिवसैनिकांनी रॅलीत जल्लोष केला. "आपण आता विधानसभेत जाऊन जनतेची सेवा करणार आहे. जनतेचं प्रेम नवा महाराष्ट्र घडवण्यास मदत करेल," अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केली. 

First Published on October 3, 2019 12:20 pm

Web Title: assembly election live update heavyweight leader fill nomination including aditya thackarey bmh 90
Next Stories
1 राष्ट्रवादीची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; नांदगावमधून पंकज भुजबळांना संधी
2 नांदेडात ट्रकने दुचाकीला चिरडले; दोघांचा मृत्यू
3 “मोदी नाही तर महात्मा गांधीच राष्ट्रपिता, तुम्ही ‘शाह’ असाल पण संविधानच बादशाह”
Just Now!
X