संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. मतदानावरही पावसाचे सावट असल्याने मतदानाची टक्केवारी घसरण्याची धास्ती प्रशासकीय यंत्रणांबरोबरच उमेदवारांमध्येही आहे. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी रविवारी राज्याच्या विविध भागांमध्ये पडलेल्या पावसाने निवडणूक यंत्रणेची तारांबळ उडाली, तर उमेदवारांच्या पोटात गोळा आला. मतदान यंत्रे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसाचा फटका बसला. भिजतच त्यांना मतदान केंद्रे गाठावी लागली. काही भागांमध्ये मतदान केंद्रांच्या आसपास चिखल झाल्याचे दिसत होते.

सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने निवडणूक यंत्रणांना सावध व्हावे लागले. मात्र, पाऊस पडला तरी मतदानावर त्याचा परिणाम होणार नाही, अशी खबरदारी घेण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपाय योजण्यास सांगितले आहे.

९६ हजार मतदान केंद्रे

मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१सव्‍‌र्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या सोयीसाठी यावेळी शक्यतो तळमजला किंवा पहिल्या मजल्यापर्यंत मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मैदान मोकळ्या जागेवर किंवा मैदानात तयार करण्यात आलेली पाच हजार ४०० मतदान केंद्र वॉटरप्रूफ  बनविण्यात आली आहेत. मतदानासाठी एक लाख ७९ हजार ८९५ मतदान यंत्रे (बॅलेट युनिट) आणि एक लाख २६ हजार ५०५ नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख ३५ हजार २१ व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑड्रिटेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत. सहा लाख ५० हजार अधिकारी- कर्मचारी तसेच तीन लाख पोलीस मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत मतदान केंद्रात कोठेही अडचण आलेली नसली तरी मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मतदारांनीही पावसाची पर्वा न करता सोमवारी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयागाने केले आहे.

मतदानासाठी सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला असून नक्षलग्रस्त गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्य़ाच्या सीमावर्ती भागात मतदानावर बहिष्कार टाकण्याची नक्षलवाद्यांनी चिकटवलेली पत्रके स्थानिक लोकांनी जाळून टाकली असून मतदारांमध्ये चांगला उत्साह आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या भागात कडेकोट बंदोबस्तासह तीन हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्यातील २,७६२ मतदान केंद्र संवेदनशील( क्रिटिकल) म्हणून जाहीर करण्यात आली असून त्या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३५० तुकडय़ासह सुमारे तीन लाख पोलिसांचा बंदोबस्त राज्यभरात तैनात करण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा..

मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर स्वत:ची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक, पॅनकार्ड , राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड

दृष्टिक्षेपात निवडणूक

* एकूण जागा- २८८

* उमेदवार- ३२३७( २३५ महिला)

* मतदार-आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६००

* एकूण मतदान केंद्रे- ९६ हजार ६६१

* निवडणुकीसाठी कर्मचारी- ६ लाख ५० हजार

* सुरक्षा- तीन लाख पोलीस कर्मचारी

हरयाणा विधानसभेसह ५१ जागांसाठी पोटनिवडणूक

महाराष्ट्र विधानसभेबरोबरच हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी आज मतदान होत आहे. हरयाणामध्ये सत्ताधारी भाजपची लढत कॉंग्रेसशी आहे. हरयाणात सुमारे १.८३ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील.  विविध १८ राज्यांतील विधानसभेच्या ५१ जागांसाठी तर लोकसभेच्या सातारा आणि बिहारमधील समस्तीपूर या दोन जागांसाठीही आज मतदान होत आहे.