राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान सर्वसामान्यांसह अनेक नेतेमंडळी आणि सेलिब्रेटीही मतदानासाठी बाहेर पडले आहेत. पुण्यातील पर्वती येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या ९७ व्या वर्षीही बाबासाहेब पुरंदरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपलं कर्तव्य पार पाडलं.

यावेळी बोलताना त्यांनी लोकांना बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं. “मतदान करणं आपलं कर्तव्य आहे. याच भावनेने मी आलो आहे. कोणीही माझ्याकडे मतदानासाठी चला म्हणून हट्ट धरला नाही, किंवा जबरदस्ती गाडीत बसवलेलं नाही. तसंच कोणीही पैसेदेखील दिलेले नाहीत. मतदान करणं एक प्रकारचा आनंद असतो,” यावेळी त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रासाठी तुमचं काय व्हिजन आहे असं विचारलं असता बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलं की, “पुढचं पाऊल पुढेच पडलं पाहिजे मग ते कोणतंही क्षेत्र असो. आपण मागे राहता कामा नये. आपण नेहमी पुढे चालत राहिले पाहिजे”, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच मेरा भारत महान ट्रकपुरतं राहू नये, हे संपूर्ण देशासाठी लागू असं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

९६ हजार मतदान केंद्रे
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१सव्‍‌र्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.