News Flash

बार्शीचा आमदार अन् गृहमंत्रीही

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती होवो वा न होवो, आपली कुस्ती तर होणारच

(संग्रहित छायाचित्र)

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना केवळ आमदारकीचेच नव्हे तर चक्क गृहमंत्रिपदाचे स्वप्न इच्छुकांना पडायला लागले आहेत. सोलापूर जिल्ह्य़ात बार्शीसारख्या भागात स्वत:ला सिंघम म्हणवून घेणाऱ्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याने स्वत: आमदार होऊन पुढे लगेचच गृहमंत्री कसा होणार, याची झलक दाखविणारे डिजिटल फलकच झळकावले आहे. त्याची आगळीवेगळी चर्चा बार्शीच्या इरसाल राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

पोलीस खात्यात सेवेत असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन नंतर शिवसेनेत प्रवेश घेतलेले भाऊसाहेब आंधळकर यांनी गेल्या पाच वर्षांपासून बार्शी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री दिलीप सोपल व भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे दोघे तुल्यबळ नेते एकमेकांविरूध्द लढत देण्यासाठी सज्ज झाले असून ही संभाव्य लढत पक्षापेक्षा पारंपरिक गटबाजीच्या राजकारणामुळेच गाजणार आहे. भाजप-सेना युतीमध्ये जागा वाटपात बार्शीची जागा शिवसेनेकडे आहे. राजेंद्र राऊत हे यापूर्वी सेनेत होते. सेनेच्या तिकिटावर त्यांनी सोपल यांना पराभूत करून आमदारकी मिळविली होती. अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आल्यानंतर राऊत यांनी सेना सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती होवो वा न होवो, आपली कुस्ती तर होणारच, असा निर्धार करीत राऊत हे जोरदारपणे तयारीला लागले आहेत.

सोपल व राऊत अशी दुरंगी लढत अपेक्षिली जात असताना शिवसेनेकडून माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी तर बार्शीची आमदारकी आपल्यालाच मिळणार असल्याचा आत्मविश्वास बाळगला आहे. एवढेच नव्हे तर स्वत:ला ‘सिंघम’ संबोधत आपण आमदारकीपाठोपाठ राज्याचा गृहमंत्री कसे होणार, हे पटवून सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी उद्या शनिवारी बार्शीत जनादेशाच्या नावाखाली जाहीरसभाही आयोजिली आहे. मात्र यानिमित्ताने बार्शीकरांची करमणूक होणार असल्याचे दिसून येते.

बार्शी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करणारे माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी स्वत:ला ‘सिंघम’ म्हणून संबोधताना आमदारकीसह गृहमंत्रिपदासाठीही आत्मविश्वास बाळगला आहे. तशा आशयाचे स्वत:चे डिजिटल फलकही त्यांनी झळकावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 2:13 am

Web Title: barshi mla and home minister bhausaheb andhalkar abn 97
Next Stories
1 नवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू – पवार
2 महायुती झाली तर 205, न झाल्यास भाजपा 144 शिवसेना 39 जागा; एबीपी माझा सी व्होटर्सचा सर्व्हे
3 निवडणूक निकालानंतर राज्यात आघाडी सरकार येईल : बाळासाहेब थोरात
Just Now!
X