शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करु नका असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या घडामोडींशी संबंधित असलेल्या जवळच्या सूत्राच्या हवाल्याने मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार बनवणार असेल तर त्यांना सरकार स्थापन करु द्या. विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्यासाठी तयार राहा. घोडेबाजाराच्या घाडेरडया राजकारणात पडू नका. दीर्घकाळाचा विचार करता भाजपासाठी ते हिताचे राहणार नाही असे भागवत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सोमवारी मोहन भागवत यांना पत्र लिहून शिवसेना-भाजपामध्ये सुरु असलेल्या संघर्षात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करणार नाही असेही भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. २०१४ ची परिस्थिती वेगळी होती. आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढलो होतो. यावेळी आम्ही भाजपा-शिवसेना युतीसाठी जनतेकडे मते मागितली होती असे या नेत्याने सांगितले.

आणखी वाचा- शिवसेनेशिवाय भाजपाचं सरकार टिकणार नाही : जयंत पाटील

मोहन भागवत आणि उद्धव ठाकरेंमध्ये अजूनपर्यंत चर्चा झालेली नाही
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी स्पष्ट केले. आज मातोश्रीवर नवनिर्वाचित शिवसेना आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे.

शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार दगाफटका करणार नाहीत अशा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तुम्ही पक्षाची भूमिका मांडत आहात का? या प्रश्नावर राऊत यांनी मी उद्धव ठाकरेंचे विचार मांडत आहे असे उत्तर दिले.