“स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देणं म्हणजे बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंगांसह क्रांतिकारकांचा अपमान ठरेल,” असं धक्कादायक मत विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याने व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कन्हैयाकुमार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. कन्हैयाकुमार गुरूवारी अहमदनगरमध्ये होता. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने हे विधान केलं. कन्हैयाकुमार म्हणाला, “महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये ज्या सावरकरांचा सहभाग होता. त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा करणाऱ्या भाजपा सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. या सरकारच्या विरोधात बोलणारे पत्रकार, कलाकार, विद्यार्थी यांना दोषी ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचे काम केलं जात आहे. सत्ताधारी पैसा कमवित आहेत. तर काही नेते पक्षांतर करून स्वतःकडील पैसा वाचवण्याची धडपड करीत आहे. सरकारकडून सरकारी संस्थांचा गैरवापर करून ईडीची भीती घातली जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांकडे दुर्लक्ष करून संभ्रम निर्माण केला जात आहे. भाजपाकडून धार्मिक आणि इतर भावनिक प्रश्न उपस्थित केले जात आहे,” असा आरोप कन्हैयाकुमारने केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या भाजपाच्या भूमिकेला कन्हैयाकुमारने विरोध केला. कन्हैयाकुमार म्हणाला, “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न दिला तर देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंगांसह क्रांतिकारकांचा अपमान ठरेल. भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. पण, त्यानंतर कुणालाही हा पुरस्कार देऊ नये,”असं कन्हैयाकुमार म्हणाला.

“महाराष्ट्रामध्ये काळा पैसा, दलितांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या, शेती, बेरोजगारी असे प्रश्न असताना भाजपा फक्त कलम ३७०वर बोलत आहे. ही एक प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. आंबेडकरांच्या विचारांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. पण, राज्यात कुणीही विरोधक एकत्र येताना दिसत नाही. आता युवकांनी पुढं येऊन सक्षम उभा करायला हवा,” असंही कन्हैयाकुमार म्हणाला.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये भाजपाने महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी घोषणा भाजपानं केली आहे.