विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांच्या प्रचारासाठी ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता भाऊ कदम आणि अभिनेत्री श्रेया बुगडे मैदानात उतरले. एरव्ही प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे विनोदवीर प्रचारात सहभागी झाल्याने मतदारांचं लक्ष वेधलं गेलं. प्रचारानिमित्त का होईना आपल्या लाडक्या कलाकारांना जवळून पाहण्यासाठी नालासोपाऱ्यात तुफान गर्दी उसळली होती. नालासोपारा आचोळे रोड येथून मोरेगाव तलावापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी सभापती भरत मकवाना, निलेश देशमुख, रुपेश जाधव, अरुण जाधव यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

क्षितीज ठाकूर यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रोड शो करण्यावर भर दिला. यावेळी तरुणांना आकर्षित करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या कलाकारांना प्रचारात सहभागी करण्याचा फंडा वापरण्यात आला. क्षितीज ठाकूर यांचा विजय पक्का असल्याचे मत भाऊ कदम यांनी यावेळी मांडले.

नालासोपारा हा मतदारसंघ हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला. मात्र यंदा माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला. शर्मा यांनी ठाकूर यांच्या साम्राज्याला आव्हान दिले आहे, तर हितेंद्र ठाकूर यांनीही आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरारमध्ये सभा घेऊन हितेंद्र ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला, त्याच वेळी क्षितीज ठाकूर यांच्या रोड शोमध्ये भाऊ व श्रेया सहभागी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघातील चुरस आणि वाक्युद्ध चांगलेच रंगले आहे.