कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. “राज्यात कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसेल तर कुणीही काय केलं असतं,” असं सांगत बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी समर्थन केलं आहे. पटनातील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील राजकीय स्थितीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

राज्यात भाजपा-शिवसेना युतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून शिवसेना भाजपापासून दूर झाली आहे. त्यामुळं १०५ आमदार असूनही भाजपाला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यात वेळेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून पाठिंबा न मिळाल्यानं शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. राष्ट्रवादीनेही सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. कोणत्याही पक्षाकडून सत्तेचा दावा न करण्यात आल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

त्यानंतर राजकीय पक्षांकडून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह काही राजकीय विश्लेषकांनी यावर टीका केली आहे. त्यानंतर अमित शाह यांनीही राज्यातील राष्ट्रपती राजवटीविषयी भूमिका मांडली. “राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली नसती तर भाजपाला काळजीवाहू सरकार चालवायचं आहे,” असा आरोप आमच्यावर झाला असता. पेच निर्माण झाल्यानंतर राज्यपालांचं काही चुकलेलं नाही. १८ दिवस सत्तास्थापनेसाठी कुठेही लागलेले नाही. आता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करुन सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी जावं आणि सरकार स्थापन करावं,” असं अमित शाह म्हणाले होते.

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही समर्थन केलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जंयतीनिमित्त पटनामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान नितीश कुमार यांना महाराष्ट्रातील स्थितीविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी नितीश कुमार म्हणाले, “मी याविषयी काय सांगू शकतो. कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास सक्षम नसेल, तर अशा स्थितीत कोणीही काय करेल. राजकीय पक्षांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे. आम्ही यासंदर्भात काहीही करू शकत नाही,” असं त्यांनी सांगितलं.