28 February 2021

News Flash

संजय राऊत यांनी कमी बोलावं अशी अपेक्षा – आशिष शेलार

भाजपा नेते आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली

गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत सध्या लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली असून बुधवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी कमी बोलावं अशी अपेक्षा असल्याचा टोला लगावला.

आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं की, “संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी मी आलो होतो. यावेळी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यात आली असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. वैचारिक मतभेद असले तरी राजकारणात एकमेकांची विचारपूस करणं महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपेरला धरुन आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नव्हता”. पुढे बोलताना त्यांनी संजय राऊत यांनी तब्येतीच्या कारणामुळे कमीच बोलावं अशी आमची अपेक्षा असल्याचं सांगितलं.

सत्तास्थापनेसाठी राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेनेची खिंड लढवणारे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवून आवश्यक चाचण्या आणि सायंकाळी एन्जिओग्राफी करण्यात आली. त्यात दोन ब्लॉकेजेस आढळळ्याने डॉ मॅथ्यू यांनी त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी केली.

दरम्यान रुग्णालयात असतानाही संजय राऊत राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील त्यांचा एक फोटो समोर आला असून यामध्ये रुग्णालयात बेडवर बसून ते काम करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो एन्जिओप्लास्टी होण्याआधीचा असून यावेळी ते सामनामधील अग्रलेख लिहित होते.

भाजपाला शिंगावर घेण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असून रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन ते भाजपावर निशाणा साधत होते. मात्र रुग्णालयात दाखल झाल्याने मंगळवारी त्यांची पत्रकार परिषद होऊ शकली नाही. नेटकऱ्यांमध्येही सकाळपासून हीच चर्चा होती. मात्र रुग्णालयात असतानाही संजय राऊत यांनी ट्विट करत आपण अजूनही राज्यातील घडामोडींवर तितकंच बारीक लक्ष ठेवून असल्याचं दाखवून दिलं. त्यांनी ट्विट करत शिवसेनेनं हार मानली नसल्याचे संकेत दिले आहेत. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करून आम्ही यशस्वी होणार असल्याचं राऊत यांनी म्हटल होतं.

संजय राऊत यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार लिलावती रुग्णालयात पोहोचले होते. शरद पवार आणि नवनिर्वाचीत आमदार रोहित पवार यांनी संजय राऊत यांची सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. जवळपास १५ मिनिटं पवार लिलावतीमध्ये होते, यावेळी त्यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील होत्या अशी माहिती आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 2:31 pm

Web Title: bjp ashish shelar shivsena sanjay raut lilavati hospital maharashtra political crisis sgy 87
Next Stories
1 अविश्वसनीय करुन दाखवणार – उद्धव ठाकरे
2 महाराष्ट्रात शिवसेनेचंच सरकार येणार – मनोहर जोशी
3 संजय राऊत रुग्णालयात तरी चर्चेत, पहिला फोटो आला समोर
Just Now!
X