पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड विधानसभा मतदारसंघात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. मात्र या रॅलीदरम्यान १०० हून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वार सहभागी झाले होते. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या दुचाकी चालकांवर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातुन ओळख पटवून दुचाकीस्वारांवर कारवाई केला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावाची उमेदवारी घोषित झाल्यापासून ते प्रचाराच्या रॅलीपर्यंत अनेक कारणामुळे सतत ते प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहेत. कोथरूड भागात सकाळच्या सुमारास भव्य दुचाकी रॅली काढल्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. या रॅलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रॅलीत सहभागी विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई होणार का ? असा प्रश्न यावेळी विचारण्यात येत होता.

पुणे शहरात १ जानेवारी २०१९ पासून विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यावर शहरातील विविध संघटनांकडून आंदोलने करीत कारवाईचा निषेध देखील करण्यात आला. शहरात काही भागात पोलिसांकडून कारवाई होताना दिसत आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांच्या रॅलीत चक्क दुचाकी चालक विनाहेल्मेट सहभागी झाल्याने सर्वसामान्य पुणेकर आता कारवाई होणार का असा प्रश्न सोशल मीडियावर विचारत आहेत.

या रॅलीबाबत वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं  की, कोथरूड भागात काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत जे चालक विनाहेल्मेट सहभागी झाले होते त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.