मी काही पाकिस्तानातून आलो नाही असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. “मी पुण्यातून पदवीधर मतदारसंघाचा दोन वेळा आमदार होतो. त्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. माझ्या उमेदवारीवरुन खूप चर्चा सुरु आहे. पण मी काही पाकिस्तानातून आलेलो नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, “कोथरुडमध्ये भाजपाने बाहेरचा उमेदवार लादला कारण तुम्हाला गृहित धरलं गेलं आहे. आम्ही कोणताही माणूस कुठेही टाकला तरीही ही भाबडी जनता त्यांना निवडून देईल हा विश्वास सत्ताधाऱ्यांना वाटतो. चंद्रकांत पाटील कोल्हापुरातले आहेत तर ते कोल्हापूरमधून का उभे राहिले नाहीत? कोल्हापूरमध्ये उभं राहायला तुम्हाला भीती का वाटली?”.

पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी तसेच आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

धनंजय मुंडे ईव्हीएम मशीनबद्दल अनेक आक्षेप घेतले आहे. त्या प्रश्नावर त्यांना सांगितले की, “राज्यात मतदानानंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवल्या जातात, त्या ठिकाणी मोबाइल जॅमर लावायला हरकत नाही. मात्र राष्ट्रवादीने आता पराभवाची कारणे लिहायला सुरुवात करावी”. राज्यात महायुतीच्या किती जागा येतील त्या प्रश्नावर म्हणाले की, “अबकी बार २२० पार आपण म्हटले होते. पण आता त्याही पुढे आम्ही गेलो असून आज संध्याकाळपर्यंत नवीन सर्व्हे येईल. आमच्या किती जागा येतील, याचा फायनल आकडा मी उद्या निश्चित सांगेन”.