शिवसेना-भाजपा युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. युतीसंबंधी विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, “युतीची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. लवकरच आम्ही युतीची घोषणा करु”. नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशासंबंधी विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये यासंबंधी चर्चा असून त्यानुसार नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना, भाजपा-शिवसेना युतीमध्ये केवळ जागावाटपाचाच तिढा नसून निम्म्या जागांसह मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समान वाटपाचाही शिवसेनेचा आग्रह कायम आहे. भाजप मात्र मुख्यमंत्रीपद सोडाच, तर उपमुख्यमंत्रीपद किंवा महत्त्वाची खातीही देण्यास तयार नाही.  मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समान वाटपाच्या मुद्दय़ाचा निवडणूक निकालानंतर विचार होईल. ते कसे करायचे, यावर नंतर निर्णय होईल. आधी जागावाटपाबाबत निर्णय घेतला जाईल, त्याबाबत अजून सहमती झालेली नाही, असे स्पष्ट केले होते.

लोकसभा निवडणुकीआधी भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली. तेव्हा विधानसभेतही युती होईल आणि उभयपक्षी सत्तेचे समान वाटप होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यामुळे निम्म्या जागांसह अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद, महत्त्वाच्या खात्यांसह निम्मी खाती मिळावीत आणि सत्तावाटपाचा निर्णयही विधानसभेसाठी युतीची घोषणा करताना व्हावा, असा शिवसेनेचा आग्रह आहे. भाजपची मात्र राज्यात ताकद वाढल्याने आक्रमक असून युतीमध्ये पूर्वी शिवसेनेकडे १७१ जागा व भाजपकडे ११७ हे जुने सूत्र उलट करण्याच्या तयारीत आहे. भाजपाने तसाच प्रस्ताव शिवसेनेकडे दिला असून तो स्वीकारून भाजप आता मोठा भाऊ हे मान्य केले आणि मुख्यमंत्रिपदासह नगरविकास, अर्थ, गृह व महसूल खात्याचा आग्रह शिवसेनेने सोडला, तर युती होऊ शकेल, असे भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.