17 October 2019

News Flash

चंद्रकांत पाटील यांच्या वाहनफेरीतील कार्यकर्ते हेल्मेटविना

अनेक दुचाकीस्वार या फेरीत हेल्मेट परिधान न करता सहभागी झाले होते.

कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीतील अनेक दुचाकीस्वारांकडून गुरुवारी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन झाले. अनेक दुचाकीस्वार या फेरीत हेल्मेट परिधान न करता सहभागी झाले होते. या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी सकाळी कोथरूड भागात मोठी दुचाकी फेरी काढण्यात आली. त्यात चारचाकीमध्ये उभे राहून चंद्रकांत पाटील फेरीत सहभागी झाले होते. फेरीमध्ये कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मात्र, त्यातील अनेक कार्यकर्त्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करण्याच्या नियमाचा विसर पडल्याचे दिसून आले.

केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कायद्यानुसार पोलिसांकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसल्यास दंड आकारला जात आहे. या पाश्र्वभूमीवर, विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा सहभाग असलेल्या फेरीची छायाचित्रे अल्पावधीतच समाजमाध्यमांमध्ये फिरू लागली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून फेरीत विनाहेल्मेट सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई का नाही, असा प्रश्न समाजमाध्यमांतून उपस्थित करण्यात आला.

कोथरूड भागात काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीत विनाहेल्मेट सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाणार आहे. सीसीटीव्हीत दुचाकीस्वारांचे चेहरे आणि त्यांच्या दुचाकीचा क्रमांक पाहून कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिले.

First Published on October 11, 2019 2:26 am

Web Title: bjp chandrakant patil without helmet akp 94